मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2021 11:42 PM2021-11-15T23:42:29+5:302021-11-15T23:44:22+5:30
नांदगाव : इतकेच मला जाताना सरणावर कळले होते, मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते.
नांदगाव : इतकेच मला जाताना सरणावर कळले होते, मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते.
काशीनाथ शिंदे (वय वर्षे ७०, मूळ रा. वागण, ता.वैजापूर, जि.औरंगाबाद) यांचे नांदगावच्या लेंडी नदी किनाऱ्याजवळ ढवळे बिल्डिंग परिसरात त्यांचे वास्तव्य होते. शारीरिक व्याधींमुळे अधू असलेल्या बाबांना रस्त्यावरील नागरिक येता-जाता जेवण, नाश्ता द्यायचे. रात्री भिंतीच्या किंवा झाडाच्या आडोशाला बाबा झोपत असे. वाढलेली दाढी, शून्यात नजर आणि अंगभर चिंध्या झालेले कपडे, झोपायला रस्त्यालगतचा खड्डा अशा अवस्थेतले बाबाचे जिणे काही वर्षांपासून नांदगावकरांना माहिती झाले होते. ते उपाशी राहणार नाहीत एवढी काळजी घेतली जात असे; पण काही दिवसांपूर्वी काशीनाथ बाबांनी त्याच जागी अखेरचा श्वास घेतला. येथील युवा फाउंडेशन सामाजिक संस्थेच्या सदस्यांनी या बाबांचे अंतिम क्रियाकर्म पार पाडत सामाजिक सेवेचा आदर्श घालून दिला.
गेल्या काही वर्षांत सणासुदीला, दसरा, दिवाळीला शहरातील नागरिकांना काशीनाथ बाबांची आठवण होत असे. फराळ, कपडेलत्ते आपापल्या पद्धतीने अनेक जण त्यांना मदत करीत असत. आलेली मदत त्यांनी कधी नाकारली नाही; पण कोणी अधिकच चौकशी करू लागले तर त्यांना तर्कटलेल्या स्वरात उत्तर मिळायचे. म्हणून त्यांच्या पूर्वेतिहासाची निश्चित माहिती कोणालाच नव्हती. झाडाखालची जागा सोडून इतरत्र जाताना त्यांना कोणीही पाहिले नव्हते. जेव्हा जेव्हा वेळ आली तेव्हा सेवा करण्याची संधी येथील युवा फाउंडेशन सामाजिक संस्थेच्या सदस्यांनी केली. त्यांना अखेरचा निरोप देण्याची सेवाही फाउंडेशनच्या सुमित सोनवणे, प्रसाद वडनेरे, नीलेश पाटील, ग्रामीण रुग्णालयाचे राम शिंदे यांच्या माध्यमातून घडली. नांदगाव पोलीस स्टेशनचे नाईक राकेश चौधरी, पोलीस शिपाई अमोल शिंदे यावेळी उपस्थित होते.