केशकर्तनचा व्यवसाय झाला हायटेक!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2019 12:54 AM2019-06-24T00:54:33+5:302019-06-24T00:54:58+5:30
केशकर्तन! दहा बोटांची कला पण व्यक्तीच्या सौंदर्यात भर घालणारी! बारा बलुतेदारीतील या व्यवसायाने आता कात टाकली असून, हा व्यवसाय आता नव्या पद्धतीने बदलू लागला आहे. विशेषत: नाशिकसह राज्यात अनेक ठिकाणी कार्पोरेट कंपन्या उतरल्या
नाशिक : केशकर्तन! दहा बोटांची कला पण व्यक्तीच्या सौंदर्यात भर घालणारी! बारा बलुतेदारीतील या व्यवसायाने आता कात टाकली असून, हा व्यवसाय आता नव्या पद्धतीने बदलू लागला आहे. विशेषत: नाशिकसह राज्यात अनेक ठिकाणी कार्पोरेट कंपन्या उतरल्या असून, त्यांना या व्यवसायाचे महत्त्व उमगल्याने पारंपरिक नाभिक समाजाचे केशकर्तन व्यावसायिकदेखील आता बदलू लागले आहेत.
केशकर्तन म्हणजेच केस कापण्याबरोबरच दाढी करणे यापलीकडे आता व्यवसाय कधीच गेला असून, मुलांमुलींतील वाढत्या सौंदर्याच्या कल्पनांमुळे हा व्यवसाय अधिकच व्यापक होत चालला आहे. केशकर्तनाचा हा व्यवसाय पारंपरिक आणि पिढीजात चालत आलेला आहे. घरातून केशकर्तनाचे धडे मिळत असले तरी समाज व्यवस्थेत समाजाला खूप महत्त्व होते. ग्रामीण भागात आसामी म्हटले जात म्हणजेच दाढी आणि केशकर्तनाच्या बदल्यात वर्षभराचे धान्य दिले जात. जावळ काढणे, मौंजी इतकेच नव्हे तर गंधमुक्तीलादेखील नाभिक समाजाकडेच मान होता. आता काळ बदलला. समाज या व्यवसायात स्थिरावला. परंतु केशकर्तन हा ‘व्यवसाय’ झाला आणि व्यवसाय म्हंटला की, तो कोणीही करू शकतो याच धर्तीवर सेलीब्रिटींच्या केशकर्तनालय आणि ग्रुमिंगची दुकाने थाटली जाऊ लागली. नाशिकमध्येदेखील आठ ते दहा सौंदर्य प्रसाधने उत्पादन कंपन्यांनी आणि केशकर्तनाच्या कार्पोेरेट कंपन्यांनी फ्रेंचाइजी दिल्या आहेत. काम केशकर्तनाचेच, परंतु अत्यंत सुबक आणि व्यावसायिक पद्धतीने होऊ लागले. पारंपरिक व्यवसायाला असा ग्लोबल टच आणि कार्पोरेट लुक आल्यानंतर नाभिक समाजाच्या नव्या पिढीलादेखील त्याचे मोल कळले.
व्यवसाय म्हणून अशा कंपन्यांकडून आकारले जाणारे दर आणि केली जाणारी सेवा यामुळे या नव्या पिढीला धडा मिळाला. नाभिक समाजेतर अनेक लोक या व्यवसायात उतरले असून, ते कार्पोरेट नाही तर पारंपरिक पद्धतीचे सलुन्स चालवित आहेत.
परंतु सलून म्हणजे नेहमीच्या कामांपेक्षा मुला-मुलींचे वेगवेगळे हेअर कट, फेशियल, मसाज, हेड मसाज, फुल बॉडी मसाज, हेअर डाय, ब्लिचिंग इतकेच नव्हे तर नखेदेखील वेगळ्या पद्धतीने कापून त्याचेदेखील सौंदर्य वाढविणे, चेहऱ्यावरील व्रण किंवा मोस काढणे यासाठी वेगळी थेरपी अशाप्रकारची सर्वच कामे होऊ लागली आहेत. मोठ्या प्रशिक्षित व्यवसायांच्या स्पामध्ये ज्या सेवा दिल्या जातील त्या सर्व आता पारंपरिक व्यावसायिकदेखील देऊ लागले आहेत. त्यासाठी सलुन्सचे अंतरंगदेखील बदलू लागले आहे. इंटेरियरचा वापर करून शहरातील विविध भागांमध्ये तसेच उपनगरांमध्येदेखील आकर्षक पद्धतीने सलुन्स सजू लागली आहेत.
दुकानांचेही बदलले स्वरूप
कोणत्याही व्यवसायासाठी तेथील आकर्षक वातावरण आणि सेवा सुविधा महत्त्वाच्या ठरतात. पारंपरिक सलुन्स व्यावसायिकांनी दुकानांचा लूक बदलला आहे. चांगले दुकान करण्यासाठी किमान आठ ते दहा लाख रुपयांचा खर्च सहज येतो. रंगसंगती, आरामदायी खुर्च्या, सौम्य संगीत, वायफाय, चहा-कॉफीची सोय अशा सर्वच प्रकारच्या सेवा सुविधा देण्यावर आता व्यावसायिकांचा भर असून, त्यामुळे ग्राहक आकर्षित होत आहे.