‘नात्यांचे सर्व्हिसिंग’मधून सकारात्मकतेची शिदोरी : विश्वास ठाकूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2021 01:26 AM2021-10-15T01:26:49+5:302021-10-15T01:27:10+5:30
जीवनाच्या वाटेत भेटलेली माणसे, त्यांचे मोठेपण आणि त्यांच्याकडून मिळालेली जीवन जगण्याची प्रेरणा ही शिदोरी घेऊन माझी वाटचाल सुरू आहे. त्या वाटचालीचे प्रामाणिक कथन ‘नात्यांचे सर्व्हिसिंग’ हा कथासंग्रह आहे. जीवन जगण्याची कला ही सकारात्मकतेतून आनंद देत असते. त्याचीच कथासंग्रहात गुंफण केली आहे, असे प्रतिपादन विश्वास को-ऑप. बँकेचे संस्थापक अध्यक्ष विश्वास ठाकूर यांनी केले.
नाशिक : जीवनाच्या वाटेत भेटलेली माणसे, त्यांचे मोठेपण आणि त्यांच्याकडून मिळालेली जीवन जगण्याची प्रेरणा ही शिदोरी घेऊन माझी वाटचाल सुरू आहे. त्या वाटचालीचे प्रामाणिक कथन ‘नात्यांचे सर्व्हिसिंग’ हा कथासंग्रह आहे. जीवन जगण्याची कला ही सकारात्मकतेतून आनंद देत असते. त्याचीच कथासंग्रहात गुंफण केली आहे, असे प्रतिपादन विश्वास को-ऑप. बँकेचे संस्थापक अध्यक्ष विश्वास ठाकूर यांनी केले.
ज्योती स्टोअर्स व शंकराचार्य न्यास (सांस्कृतिक विभाग) यांच्या ‘लेखक तुमच्या भेटीला’ उपक्रमांतर्गत ऑनलाइन व्याख्यानमालेत ‘नात्यांचे सर्व्हिसिंग’ या कथासंग्रहाच्या लेखन प्रक्रियेविषयी ठाकूर यांनी संवाद साधला.
ठाकूर म्हणाले, ‘नात्यांचे सर्व्हिसिंग’ला रसिक वाचकांच्या मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादाने मी भारावून गेलो असून, यापुढेही उत्तमोत्तम लिहिण्यासाठी बळ मिळाले आहे. गत पंचवीस वर्ष सहकार क्षेत्रात काम करत असताना आलेल्या विविध आठवणींचा हा शब्दगुच्छ आहे. त्यातून जीवन प्रवासाचा आलेख रेखाटण्याचा हा प्रयत्न आहे. लॉकडाऊनच्या काळात मिळालेल्या वेळेचा सदुपयोग म्हणजेच कथासंग्रहाचा प्रवास आहे. यातील काही अनुभव तर मला स्वत:ला हेलावून टाकणारे होते. सहकार क्षेत्रात काम करत असलेल्या अनेकांना तसेच इतर वाचकांनाही कथासंग्रहातील घटना, प्रसंग यांची जवळीक वाटते. सर्वांच्या मनातील संवेदनाच प्रातिनिधिक रूपात मांडल्या आहेत. पुस्तकाला हजारो वाचक पत्रव्यवहार तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रतिसाद देत असल्याचे ठाकूर यांनी सांगितले.
‘नात्यांचे सर्व्हिसिंग’ माझ्या आयुष्यातील संचिताला शब्दरूप देण्याचा प्रयत्न केला आहे. त्याला भरभरून प्रेम मिळत आहे. इंग्रजी व हिंदी अनुवादासाठी विचारणा होत असून, प्रस्ताव येत आहेत. त्याचबरोबर वेब सिरीजसाठीही विचारले जात असल्याची माहिती ठाकूर यांनी दिली. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक वसंतराव खैरनार यांनी केले, तर विश्वास ठाकूर यांचा परिचय डॉ. शंकर बोऱ्हाडे यांनी करून दिला.