शाळेच्या भिंतीवर कीबोर्ड, माऊस अन् मॉनिटर !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2019 04:42 PM2019-12-17T16:42:39+5:302019-12-17T16:43:00+5:30
संगणक संग्रहालय : तोरंगण आश्रमशाळेत तंत्रस्नेही शिक्षकांचा उपक्रम
वेळुंजे : शाळा-शाळांमध्ये आता संगणक चालविण्याचे प्रशिक्षण दिले जात असले तरी या संगणकाच्या अंतरंगात नेमके काय दडले आहे, हा संगणक कसा चालतो यासाठी जुन्या विनावापर संगणकातील पार्टस् काढून त्याचे चक्क संग्रहालयच थाटत विद्यार्थ्यांना तंत्रस्नेही करण्याचा अनोखा उपक्रम त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तोरंगण या गावी शासकीय माध्यमिक आश्रमशाळेत राबविण्यात आला आहे. संगणकातील पार्टस्सह कीबोर्ड, माऊस अन् मॉनिटर यांचे शाळेच्या भिंतीवर प्रदर्शन थाटण्यात आले आहे.
नाशिक जिल्ह्यातील शेवटचे टोक असलेल्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तोरंगण या गावी शासकीय माध्यमिक आश्रमशाळेतील उपक्र मशील शिक्षक नितीन केवटे व ओंकार भोई यांच्या प्रयत्नातून शाळेत संगणक संग्रहालय उभे राहिले आहे. विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाबरोबर डिजिटल साक्षरतेचे धडे गिरवता यावे या साठी घरातील व शाळेतील जुन्या संगणकातील आतील सर्व भाग मोकळे करून त्या प्रत्येक भागाला नावे देण्यात आली आहेत. मुले संगणक हाताळतात परंतु वर वर दिसणाऱ्या भागांचीच त्यांना माहिती असते . परंतु संगणकाच्या पोटात काय दडले आहे, त्यातील हार्डवेअरचे ज्ञान व माहिती व्हावी तसेच संगणकात किरकोळ बिघाड झाला तर तो घरच्या घरीच दुरु स्त करता यावा याशिवाय, संगणका सोबत वापरले जाणारे इतर उपकरणे देखील यांची माहिती व्हावी या उद्देशाने या संग्रहालयाची निर्मिती केली गेली आहे. नितीन केवटे यांनी अगोदर स्वखर्चाने संग्रहालय सुरू केले आहे. याशिवाय, समेंटचा किल्ला निर्मिती, चांद्रयान ची प्रतिकृती, सोलर गवत कटिंग मशीन, पडीत सिंटेक्स टाकी पासून शौचालय निर्मिती यासह विविध शैक्षणिक साहित्याची निर्मिती केली आहे. विशेष म्हणजे यातील बरेच साहित्य हे रविवारी सुट्टीच्या दिवशी विद्यार्थ्यांच्या हस्ते रविवारचा विरंगुळा या उपक्र मा अंतर्गत तयार करण्यात आले आहे.