कायाकल्प’ योजनेत प्रथम क्रमांक पटकाविणाऱ्या जिल्हा रुग्णालयात खड्डेच खड्डे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2019 01:05 AM2019-07-09T01:05:51+5:302019-07-09T01:06:15+5:30
केंद्र सरकारच्या ‘कायाकल्प’ योजनेत प्रथम क्रमांक पटकाविणाऱ्या जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या आवारात मात्र संततधारेने खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे पावसाच्या पाण्याचे डबके साचत असून रुग्णांसह नातेवाइकांचेही हाल होत आहेत.
नाशिक : केंद्र सरकारच्या ‘कायाकल्प’ योजनेत प्रथम क्रमांक पटकाविणाऱ्या जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या आवारात मात्र संततधारेने खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे पावसाच्या पाण्याचे डबके साचत असून रुग्णांसह नातेवाइकांचेही हाल होत आहेत. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वारापासून संपूर्ण परिसरातील खड्डे बुजविण्याची मागणी केली आहे.
जिल्हा सरकारी रु ग्णालयाच्या प्रवेशद्वारालगतच पोलीस चौकी असून, गेल्या दोन-तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाच्या संततधारेने चौकीभोवती पाण्याचे तळे साचले आहे. त्यामुळे पोलीस अधिकारी-कर्मचारी आणि रुग्णांच्या नातेवाइकांना चिखल तुडवत पोलीस चौकीची पायरी चढावी लागत असल्याचे चित्र आहे. याबाबत जिल्हा रुग्णालय व्यवस्थापनाने पावसाळ्याच्या सुरुवातीलाच सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्र ार करत परिसरातील आवारात डांबरीकरण करण्याची मागणी केली होती, मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात आले. परिणामी नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
शहरात मागील चार दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. रविवारी जोरदार पाऊस झाल्याने रुग्णालयाच्या आवाराची दुरवस्था झाली. पोलीस चौकीची पहिली पायरी पाण्याखाली बुडाल्याचे चित्र होते. तसेच रुग्णालयाच्या परिसरात मुख्य प्रवेशद्वारापासून सगळीकडे पसरलेल्या खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने डबके साचले होते. पोलीस चौकीसमोर मात्र सखल भाग असल्याने मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचत असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. जिल्हा रुग्णालय असल्यामुळे मोठ्या संख्येने रुग्णवाहिका, पोलीस वाहने, नागरिकांच्या वाहनांनी ये-जा सुरू असते. त्यामुळे या भागात चांगल्या दर्जाचे डांबरीकरण करण्याची गरज आहे. थातूरमातूर पद्धतीने मुरूम टाकून प्रश्न मार्गी लागणार नाही़
रुग्णांना बसतोय ‘दणका’
४शासकीय रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वारापासून खड्डे पडले असल्यामुळे स्ट्रेचरपर्यंत रुग्णवाहिका येईपर्यंत रुग्णवाहिकेत असलेल्या रुग्णांना चांगलेच दणके सहन करावे लागतात. अत्यवस्थ गंभीर परिस्थितीत रुग्णांना रुग्णालयात पोहचविण्याचे आव्हान रुग्णवाहिका चालकांपुढे असते त्यामुळे रुग्णवाहिकांचा वेग साहजिकच अधिक असतो; मात्र रुग्णालयात प्रवेश करताना सर्वच रुग्णवाहिकांचा वेग कमी होतो कारण मुख्य रस्त्यावरून वळण घेत आतमध्ये यावे लागते. मात्र तरीदेखील थोड्या अधिक प्रमाणात वेगाने रुग्णवाहिका दाखल होतात. यावेळी परिसरात असलेल्या खड्ड्यांमुळे रुग्णवाहिका आदळत इमारतीच्या पोर्चपर्यंत पोहचते.