भाजपा नगरसेवकांमध्ये खदखद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2018 01:00 AM2018-05-20T01:00:49+5:302018-05-20T01:00:49+5:30
महापालिकेत स्पष्ट बहुमत असूनही विकासकामांबाबत होत असलेली परवड, करवाढीवरून नागरिकांकडून जाब विचारला जात असताना पक्षनेतृत्वाने धारण केलेले मौन, शहराध्यक्ष तथा आमदार बाळासाहेब सानप यांच्याविरुद्धचा वाढत चाललेला रोष आणि विधान परिषद निवडणुकीत विश्वासात न घेता होत असलेल्या राजकारणामुळे भाजपा नगरसेवकांमध्ये मोठ्या प्रमाणावर खदखद दिसून येत आहे.
नाशिक : महापालिकेत स्पष्ट बहुमत असूनही विकासकामांबाबत होत असलेली परवड, करवाढीवरून नागरिकांकडून जाब विचारला जात असताना पक्षनेतृत्वाने धारण केलेले मौन, शहराध्यक्ष तथा आमदार बाळासाहेब सानप यांच्याविरुद्धचा वाढत चाललेला रोष आणि विधान परिषद निवडणुकीत विश्वासात न घेता होत असलेल्या राजकारणामुळे भाजपा नगरसेवकांमध्ये मोठ्या प्रमाणावर खदखद दिसून येत आहे. काही नगरसेवक उघडपणे स्थानिक पक्षनेतृत्वाविषयी नाराजी व्यक्त करू लागल्याने येत्या काळात भाजपात मोठ्या प्रमाणावर उलथापालथ होण्याचे संकेत मिळत आहेत. महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या त्रिसूत्रीमुळे मागील वर्षी मंजूर करण्यात आलेल्या अनेक विकासकामांना कात्री लागल्याने भाजपासह विरोधी नगरसेवकांमध्येही नाराजीचा सूर आहे. त्यातच, आयुक्तांनी अंदाजपत्रकातील तरतुदीनुसारच विकासकामे होणार असल्याचे स्पष्ट केल्याने कोणत्याही नव्या कामांचा प्रस्ताव प्रशासकीय पातळीवरून धुडकावला जाऊ लागला आहे. अंदाजपत्रकात समाविष्ट करण्यात आलेली कामेच होतील आणि सदर कामांना अंदाजपत्रकीय विशेष महासभेतच प्रशासकीय मंजुरी मिळालेली असल्याने ती कामे पुन्हा महासभेवर येणार नाहीत. परिणामी, गेल्या तीन महिन्यांत झालेल्या महासभांमध्ये एकही प्रस्ताव दाखल होऊ शकलेला नाही. केवळ इतिवृत्तांना मंजुरी देण्याचेच काम महासभेला उरले आहे. नवीन कामे घेतली जाणार नसल्याने महापालिका मुख्यालयातील नगरसेवकांची वर्दळही रोडावली आहे. आयुक्तांनी तक्रारींसाठी एनएमसी ई-कनेक्ट हे मोबाइल अॅप आणल्याने आणि या अॅपवर नगरसेवकांनीही तक्रारी कराव्यात, असे सांगितले जात असल्याने नगरसेवकांचे नेमके काम काय? असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे. सत्तेत असूनही बेदखल केले जात असल्याने भाजपा नगरसेवकांमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजीचा सूर दिसून येत आहे.
खांदेपालटाची शक्यता
भाजपाच्या हाती सत्ता येऊन सव्वा वर्षांचा कालावधी झाला आहे. या काळात ठोस अशी कोणतीही कामे न झाल्याने सत्ताधारी भाजपात कमालीचा रोष आहे. त्यातच आयुक्तांची ‘एकला चलो रे’ भूमिका असल्याने नगरसेवकांना काहीच काम उरले नसल्याची भावना बळावत चालली आहे. गेल्या तीन महिन्यांपासून प्रभागातील कामेही ठप्प झालेली आहेत. मंजूर कामेही रद्द करण्यात आलेली आहेत. जून महिन्यात महापौरांसह पदाधिकाऱ्यांचा सव्वा वर्षांचा कालावधी पूर्ण होत आहे. पालकमंत्र्यांनी यापूर्वीच या पदाधिकाºयांचे राजीनामे घेऊन ठेवलेले आहेत. त्यामुळे एकूणच स्थिती पाहता, जून महिन्यात खांदेपालट होण्याची शक्यता असून, भाजपा संघटन पातळीवरही मोठ्या प्रमाणावर फेरबदलाचे संकेत मिळत आहेत.