आदिवासींच्या निधीची बिगर आदिवासी भागात खैरात
By admin | Published: April 1, 2016 11:15 PM2016-04-01T23:15:11+5:302016-04-02T00:08:59+5:30
चौकशीची मागणी : एकाच तालुक्यात सर्वाधिक निधी
नाशिक : आदिवासी उपयोजनेंतर्गत आदिवासी तालुक्यांमधील बंधाऱ्यांसाठी आदिवासी विकास विभागाने उपलब्ध करून दिलेला सुमारे साडेतीन कोटींचा निधी जिल्हा परिषद अध्यक्षांनी परस्पर बिगर आदिवासी तालुक्यांमध्ये वळविल्याचा आरोप कॉँग्रेसचे गटनेते संपतराव सकाळे यांनी केला आहे.
विशेष म्हणजे या कोट्यवधीच्या निधीतील दीड ते दोन कोटींचा निधी एकट्या बागलाण तालुक्यात वळविण्यात आला असून तो एका ठरावीक ठेकेदाराला दिल्याने सदस्यांमध्ये ‘चलबिचल’ वाढली आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी माजी उपाध्यक्ष तथा कॉँग्रेस गटनेते संपतराव सकाळे यांनी केली आहे.
आदिवासी विकास विभागाच्या वतीने आदिवासी तालुक्यांमध्ये दुष्काळ निवारण व जलपुनर्भरण योजनांच्या माध्यमातून लहान मोठी बंधारे व सिमेंट बंधारे बांधण्यासाठी सुमारे साडेतीन कोटींचा निधी राखीव ठेवला होता; मात्र काही दिवसांपूर्वी हा निधी अचानक बिगर आदिवासी तालुक्यात वळविण्याच्या हालचाली सुरू असल्याचे आपल्या कानावर आले होते. आता दोन-तीन दिवसांपूर्वीच यातील ७० ते ८० टक्के निधी कसमा पट्ट्यात वळविण्यात आला असून त्यात मोठ्या प्रमाणात अर्थपूर्ण घडामोडी झाल्याचा आरोप संपतराव सकाळे यांनी केला आहे.
मुळातच आदिवासी बांधवाच्या पाण्याच्या सोयीसाठी हा निधी शासनाने आदिवासी विकास विभागाला वितरित केलेला असताना तो आदिवासी विकास विभागातील संबंधित अधिकारी व जिल्हा परिषदेतील पदाधिकाऱ्यांच्या संगनमताने बिगर आदिवासी
भागात का वळविण्यात आला? त्याची चौकशी झाली पाहिजे,
अशी मागणी संपतराव सकाळे यांनी केली आहे. या सर्व प्रकरणात बागलाण तालुक्यातील मक्तेदारांसाठी कामे मिळवून देणाऱ्या एका नेत्र ‘दीपक’ ठेकेदाराभोवती संशयाची सूई व्यक्त करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)