खाकीचा गहिवर!

By किरण अग्रवाल | Published: November 4, 2018 12:31 AM2018-11-04T00:31:24+5:302018-11-04T00:33:10+5:30

खाकीच्या धाकाची, अथवा तो ओसरल्याची बाब नेहमीच चर्चेत येते किंवा टीका-टिप्पणीची ठरते; परंतु या ‘खाकी’तही असलेल्या माणुसकीचा गहिवर जेव्हा प्रत्ययास येतो तेव्हा त्यास सलाम केल्याखेरीज राहता येत नाही. कर्तव्याच्या पलीकडे जाऊन माणुसकी धर्म व संवेदनशीलतेचा परिचय घडविणाऱ्या अशा घटना अपवादात्मक असतात; परंतु त्या इतरांसमोर आदर्श घालून देणाºया ठरतात. रस्त्यावर टाकून दिलेल्या बेवारस अर्भकाला मायेची ऊब देणाºया पोलीस दलातील भगिनींचे कार्य असेच दीपोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सुहृदयतेचा उजेड पेरणारेच ठरले आहे.

Khakee! | खाकीचा गहिवर!

खाकीचा गहिवर!

googlenewsNext
ठळक मुद्देबेवारस अर्भकाला मायेची ऊबचांगुलपणाचीच पूजा सारे मिळून बांधूया...

खाकीच्या धाकाची, अथवा तो ओसरल्याची बाब नेहमीच चर्चेत येते किंवा टीका-टिप्पणीची ठरते; परंतु या ‘खाकी’तही असलेल्या माणुसकीचा गहिवर जेव्हा प्रत्ययास येतो तेव्हा त्यास सलाम केल्याखेरीज राहता येत नाही. कर्तव्याच्या पलीकडे जाऊन माणुसकी धर्म व संवेदनशीलतेचा परिचय घडविणाऱ्या अशा घटना अपवादात्मक असतात; परंतु त्या इतरांसमोर आदर्श घालून देणाºया ठरतात. रस्त्यावर टाकून दिलेल्या बेवारस अर्भकाला मायेची ऊब देणाºया पोलीस दलातील भगिनींचे कार्य असेच दीपोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सुहृदयतेचा उजेड पेरणारेच ठरले आहे.
पोलीस दलाशी संबंधित वार्ता या अधिकतर अप्रियतेत मोडणाºयाच असतात; परंतु अशाही स्थितीत सारेच काही अंधकारलेले नाही या आशावादाला ज्यामुळे बळकटी प्राप्त होऊन जाते, तशात मोडणारी एक घटना अलीकडेच नाशिक जिल्ह्यात अनुभवयास आली आहे. साधारणत: तिनेक आठवड्यांपूर्वी त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील खंबाळेनजीक एका मंदिराजवळ एक नवजात बालक आढळून आले होते. अनाथाश्रमाकडे जाणारा हा मार्ग असल्याने कुणीतरी या बालकाला अनाथपणे तेथे टाकून दिले असावे; पण याबाबतची माहिती मिळताच त्र्यंबक पोलिसांनी तात्काळ तेथे पोहोचून बालकाला ताब्यात घेतले व रुग्णालयात दाखल केले. हे अर्भक सात महिन्यातच (प्रिमॅच्युअर) जन्मलेले असल्याने त्याला इन्क्युबेटरमध्ये ठेवणे गरजेचे होते. त्र्यंबकच्या पोलीस कॉन्स्टेबल ऋतुजा कुमावत, पद्मा चव्हाण, योगीता पुंड, माया गाडे व निता पटेकर या पाची जणींनी तब्बल २१ दिवस या बाळाची काळजी घेतली. विशेष म्हणजे, जिल्हा पोलीस अधीक्षक संजय दराडे यांच्या पत्नी रोहिणी दराडे यांनीही यात लक्ष पुरविले व मायेच्या ममतेचा परिचय देत या बाळाचे गार्गी असे नामकरणही केले. शेवटी मातेचे हृदय काय असते व कोणत्याही पाल्यासाठी ते कसे धडधडते हेच यातून बघावयास मिळाले. हाती पडले तेव्हा अवघे ७०० ग्रॅम वजन असलेले हे बालक रुग्णालयात राहून १५०० ग्रॅमचे झाल्याने अखेर त्यास आधाराश्रमात दाखल करण्यात आले. अर्थात, आधाराश्रमात गेले असले तरी ते आता निराधार नक्कीच राहिलेले नाही. परिस्थितीने ते अनाथ ठरले, मात्र ‘खाकी’तील मातृत्वाचा गहिवर या बालकाला नवे जीवन देऊन गेला आहे. दीपावलीनिमित्त दिव्यांनी व आकाशकंदिलांनी चहूदिशा उजळून निघत असताना एका अनाथाच्या आयुष्यात नवा उजेड प्रकाशला आहे. या चांगुलपणाचीच पूजा सारे मिळून बांधूया...

Web Title: Khakee!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस