‘खाकी’चे मैत्र!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2017 01:48 AM2017-09-03T01:48:49+5:302017-09-03T01:48:59+5:30

कायद्याचे राज्य साकारायचे तर पोलिसांचा धाक असावाच लागतो; पण या धाकाबरोबर मैत्रीचे संबंध प्रस्थापित करता आले तर त्यातून विश्वास वाढीस लागतो आणि एका अनामिक भीतीपोटी म्हणा अगर पोलिसी कटकट टाळण्यासाठी म्हणून पोलीस स्टेशनची पायरी चढण्याचे जे टाळले जाते, ती भीती घालवता येऊ शकते; नाशिकचे पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी यासंदर्भात चालविलेल्या प्रयत्नांतून खाकीतल्या सामाजिक संवेदना जाग्या असल्याचा प्रत्ययच घडून येतो आहे.

Khakee's friendship! | ‘खाकी’चे मैत्र!

‘खाकी’चे मैत्र!

googlenewsNext

सारांश
कायद्याचे राज्य साकारायचे तर पोलिसांचा धाक असावाच लागतो; पण या धाकाबरोबर मैत्रीचे संबंध प्रस्थापित करता आले तर त्यातून विश्वास वाढीस लागतो आणि एका अनामिक भीतीपोटी म्हणा अगर पोलिसी कटकट टाळण्यासाठी म्हणून पोलीस स्टेशनची पायरी चढण्याचे जे टाळले जाते, ती भीती घालवता येऊ शकते; नाशिकचे पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी यासंदर्भात चालविलेल्या प्रयत्नांतून खाकीतल्या सामाजिक संवेदना जाग्या असल्याचा प्रत्ययच घडून येतो आहे.
नाशकातील वाढती गुन्हेगारी हा तसा चिंतेचाच विषय आहे, याबद्दल कुणाचे दुमत असू नये. विशेषत: गेल्या आठ महिन्यात आतापर्यंत २९ खून पडले आहेत. पण गुन्हेगारी टोळीशी संबंधातून घडलेल्या घटना वगळता अधिकतर प्रकार घरगुती वा वैयक्तिक कारणातून घडले आहेत. सोनसाखळी ओढण्याचे प्रकारही थांबू शकलेले नाहीत. अन्यही गुन्हेगारी नोंदी वाढत आहेत हे खरेच. पण त्याचसोबत नियमांबरोबरच सामाजिक जबाबदारीच्या बाबतीत जाणीवजागृती करण्याच्या आणि सामान्यांना निर्भय बनविण्याच्या दृष्टीने पोलीस दलाने जे जे काही प्रयत्न चालविले आहेत, ते खरेच कौतुकास्पद ठरावेत असेच आहेत. प्रत्येकाकडे संशयानेच पाहण्याची खाकीची पारंपरिक तºहा सोडून माणसातल्या चांगुलपणावर विश्वास ठेवण्याच्या पोलीस आयुक्त सिंगल यांच्या भूमिकेमुळेच हे घडून येताना दिसत आहे आणि केवळ तितकेच नव्हे, तर नियमांबाबत नागरिकांकडून अपेक्षा करताना त्याची सुरुवात आपल्या खात्यापासून करायचा पायंडाही त्यांनी पाडलेला दिसत आहे. यासंदर्भात हेल्मेट सक्तीचेच उदाहरण पुरेसे ठरावे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार हेल्मेट सक्ती करताना सिंगल यांनी अगोदर आपल्या साºया पोलिसांना तसे करणे अनिवार्य केले. आता गणेशोत्सवातही हेल्मेट न वापरणाºयांकडून ‘हेल्मेट मी घालीन, सिग्नल मी पाळीन’ अशी बाप्पाची आरती म्हणवून घेतली गेली. आठवड्यातून एक दिवस ‘नो हॉर्न डे’ची रुजुवातही केली. गुंडांची दहशत मोडून काढण्यासाठी विविध झोपडपट्ट्यांमध्ये ‘कोम्बिंग’ व ‘आॅपरेशन आॅल आउट’सारख्या मोहिमा निरंतर राबविल्या जात आहेतच, शिवाय तडीपार व अट्टल गुन्हेगारांच्या मुसक्या आवळून ते राहात असलेल्या परिसरात त्यांची ‘वरात’ काढण्याचा फंडाही राबविला जात आहे. त्यामुळे गुंडांबद्दलचे भीतीचे वातावरण कमी होण्यास मदत होत आहे. नाशिकचे पर्यटकीय महत्त्व लक्षात घेता ‘पर्यटक पोलीस’ अशी एक नवीन संकल्पनाही कृतीत आणून बाहेर गावाहून येणाºया पर्यटकांच्या सुरक्षेची काळजी वाहण्यात येत आहे. या सर्व उपक्रमांमुळे नाशिक पोलिसांना एक ‘सोशल’ चेहरा लाभून गेला आहे. त्यात भर पडली ती राज्याच्या महिला व बालकल्याण विभागाच्या सहकार्याने नुकत्याच घेण्यात आलेल्या ‘मी माझी रक्षक’ या अभिनव कार्यक्रमाची. महिलांच्या सक्षमतेबाबत वांझोटी चर्चा करण्यापेक्षा ‘ती’ला खºयाअर्थाने स्वसंरक्षक कशी करता येईल याचे अतिशय चांगले मार्गदर्शन या कार्यक्रमातून केले गेले. नेहमी पोलिसांच्या हाती दिसणाºया काठीचे यावेळी महिलांना प्रातिनिधिक स्वरूपात वाटपही केले गेले. महिलांमध्ये आत्मविश्वास जागवतानाच त्यांच्यात सतर्कतेची जाणीव करून देण्याचे काम या मेळाव्याद्वारे घडून आले. बरे, हे सर्व, म्हणजे सामान्यजनांशी विविध उपक्रमांद्वारे मैत्रीचे बंध दृढ करीत असताना मूळ कर्तव्याकडे दुर्लक्ष होऊ न देण्याचे आव्हानही पेलले. वाहतुकीचे नियम न पाळणाºयांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारत चालू वर्षात तब्बल अडीच कोटी रुपयांची भर शासकीय तिजोरीत घातली गेली आहे. एकुणात, कर्तव्य निभावताना सामाजिक जाणिवा जपण्याचे काम पोलीस दलातर्फे केले जाताना दिसत असून, त्यासाठी पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल व त्यांचे सहकारी अधिकारी लक्ष्मीकांत पाटील, श्रीकृष्ण कोकाटे आदींचे प्रयत्न व परिश्रम नि:संशय वाखाणण्याजोगेच आहेत.

Web Title: Khakee's friendship!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.