विनाकारण बाहेर वावरणाऱ्यांना पुन्हा खाकीचा 'प्रसाद'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:16 AM2021-05-21T04:16:35+5:302021-05-21T04:16:35+5:30
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शहरात गेल्या १२ तारखेपासून कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या विक्रीची दुकानेही ...
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शहरात गेल्या १२ तारखेपासून कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या विक्रीची दुकानेही बंद ठेवण्याचे आदेश काढण्यात आले आहे. केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आणि वैद्यकीय कारणांसाठी गरजूंना घराबाहेर पडण्यास मुभा देण्यात आली आहे, असे असतानाही शहरातील सर्वच रस्त्यांवर गुरुवारी सकाळपासून हळूहळू वर्दळ आणि रेलचेल वाढू लागत होती. दरम्यान, कोरोनाची दुसरी लाट ओसरू लागल्याचे सकारात्मक चित्र दिसत असताना शहरातील रस्त्यांवर होणारी गर्दी पुन्हा कोरोनाचा संसर्ग फैलावण्याचा धोका वाढविणारी ठरू शकते. त्यामुळे गुरुवारी पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी पोलीस उपायुक्त, सहायक आयुक्तांना आपापल्या हद्दीतील पोलीस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रात रिकामटेकड्यांना लाठ्यांचा सौम्य प्रसाद देण्याचे आदेश दिले. त्यानंतर सरकारवाडा, भद्रकाली, अंबड, नाशिकरोड, पंचवटी अशा विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत पोलिसांनी फौजफाट्यासह रस्त्यांवर उतरून दंडुका उगारला. रविवार कारंजा, मेनरोड, भद्रकाली, बागवानपुरा, दूधबाजार, कथडा, चौकमंडई आदी भागांत विनाकारण घराबाहेर दिसणाऱ्या तरुणांवर दंडुका चालविला. यावेळी अशा टारगट मुलांची दंडुक्याचा फटका चुकविताना धावपळ उडालेली दिसून आली. त्याचप्रमाणे विनापरवानगी दुकाने अर्धे शटर करून सुरू ठेवणाऱ्या व्यावसायिकांवरही पोलिसांनी कारवाई केली. तसेच शहरातील नाकाबंदीच्या ठिकाणी वाहनांची चोख तपासणी करण्यात येत होती. यामुळे काही नाकाबंदीच्या पॉइंटवर वाहनांच्या लांबच लांब रांगा पहावयास मिळाल्या. पोलिसांनी गुरुवारी दुपारनंतर शहरातील नाकाबंदी तसेच गस्त अधिक कडक केल्याने सर्वच भाग सामसूम झाल्याचे दिसून आले.