आता नवरात्रोत्सवासाठी खाकी सज्ज; नाशिकच्या कालिका मातेच्या यात्रेत साध्या वेशातील पोलीसांचा असणार ‘वॉच’
By अझहर शेख | Published: September 25, 2022 07:41 PM2022-09-25T19:41:43+5:302022-09-25T19:42:25+5:30
नाशिक : गणेशोत्सव शांततेत पार पाडल्यानंतर आता नवरात्रोत्सवाला सोमवारपासून (दि.२६) प्रारंभ होत आहे. या पार्श्वभूमीवर ‘खाकी’ पुन्हा एकदा आदीशक्तीचा ...
नाशिक : गणेशोत्सव शांततेत पार पाडल्यानंतर आता नवरात्रोत्सवाला सोमवारपासून (दि.२६) प्रारंभ होत आहे. या पार्श्वभूमीवर ‘खाकी’ पुन्हा एकदा आदीशक्तीचा जागर करणाऱ्या भाविकांच्या सुरक्षिततेसाठी सज्ज झाली आहे. पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत नवरात्रोत्सवासाठी चोख बंदोबस्ताची आखणी करण्यात आली आहे. सोनसाखळी चोरांचा बंदोबस्त करण्यासाठी साध्या वेशात पोलिसांची गस्त राहणार असल्याचे सुत्रांनी सांगितले.
घटस्थापनेपासून शहर व परिसरात सर्वत्र नवरात्रोत्सवाचा उत्साह व जल्लोष बघावयास मिळणार आहे. शहरातील कॉलेजरोड, गंगापुररोड, पंचवटी, नाशिकरोड, इंदिरानगर, सिडको, सातपूर आदी उपनगरीय भागांमध्ये विविध सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांकडून गरबा-दांडियांचे आयोजन करण्यात आले आहे. या गर्दीत महिला-तरुणींच्या गळ्यातील दागिने ओरबाडण्यासह भुरट्या चोऱ्या व टवाळखोरी वाढण्याची शक्यता लक्षात घेत पोलिसांनी सुक्ष्म नियोजन केले आहे. सर्वच पोलीस ठाण्यांच्या वरिष्ठ पोलीस निरिक्षकांना याबाबत आयुक्तालयाकडून सूचना देण्यात आल्या आहेत. मंडळांच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा आग्रह पोलिसांकडून करण्यात आला आहे. सर्व पोलिस ठाणेनिहाय गुन्हे शोध पथकांसह निर्भया, गुन्हे शाखांची पथके यांची विशेष गस्त राहणार आहे.
मंडळांना स्वयंसेवक नेमण्याची सूचना -
गरबा, दांडिया रासचे आयोजन करणाऱ्या सार्वजनिक मंडळांनी आपापल्या भागात कार्यक्रमाच्या वेळेत स्वयंसेवकांची नियुक्ती करावी. या स्वयंसेवकांची ओळख पटेल असे विशिष्ट टी-शर्ट व ओळखपत्र त्यांना द्यावे. जेणेकरून बंदोबस्तावरील पोलिसांनाही त्यांना सहज ओळखणे सोपे होईल. तसेच येणाऱ्या भाविकांचीही गैरसोय होणार नाही. महिला-तरुणींची छेड, चेन स्नॅचिंग, मोबाइल अथवा पर्स चोरीसारख्या घटनांनाही यामुळे काही प्रमाणात आळा बसण्यास मदत होईल, असे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
कालिका यात्रोत्सवात ‘पोलीस मदत कक्ष’ -
मुंबईनाका परिसरात भरणाऱ्या कालिका माता यात्रोत्सवात पोलिसांचा नेहमीप्रमाणे ‘मदत कक्ष’ सज्ज राहणार आहे. या मदत कक्षातून भाविकांना अत्यावश्यक अशी मदत पुरविली जाणार आहे. तसेच साध्या वेशातील गुन्हे शोध पथकाचे कर्मचारी तसेच खाकी गणवेशातील पोलिसांचाही यात्रोत्सवासाठी बंदोबस्त देण्यात आला आहे. दीडशे ते दोनशे अंमलदार बंदोबस्तावर असणार आहेत, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरिक्षक सुनील रोहकले यांनी दिली.
यात्रा सीसीटीव्हींच्या नजरेत -
यात्रोत्सवात होणारी यावर्षीची गर्दी ही दुप्पट असण्याची श्यक्यता नाकारता येत नाही. यामुळे त्या पार्श्वभुमीवर बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहेत. यात्रोत्सवात मंदिर विश्वस्त समितीतर्फे सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत. पोलिस कक्षातून प्रत्येक हालचालींवर नजर असेल.