निफाड तालुक्यात मातब्बरांचे गड खालसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 08:53 PM2021-01-19T20:53:38+5:302021-01-20T01:27:15+5:30
ओझर : निफाड तालुक्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत अनेक ठिकाणी झालेल्या प्रतिष्ठेच्या लढतीत मातब्बरांचे गड खालसा झाले, तर अनेक ठिकाणी गाव पुढाऱ्यांना सत्ता कायम राखता आली.
ओझर : निफाड तालुक्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत अनेक ठिकाणी झालेल्या प्रतिष्ठेच्या लढतीत मातब्बरांचे गड खालसा झाले, तर अनेक ठिकाणी गाव पुढाऱ्यांना सत्ता कायम राखता आली.
लासलगावात अनेक वर्षांपासून कट्टर राजकीय विरोधक असलेले जयदत्त होळकर आणि नानासाहेब पाटील यांच्या पॅनलने दहा जागांवर बाजी मारली, तर जिल्हा परिषद सदस्य डी.के. जगताप कल्याणराव पाटील यांच्या गटाला सात जागांवर समाधान मानावे लागले. शिवडीत जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांना जोरदार धक्का देत, रासाका बचाव समितीचे नामदेव शिंदे यांनी सहा जागा काबीज केल्या. नैताळेत जेसीबीच्या साहाय्याने गुलाल उधळण्याचे स्वप्न राष्ट्रवादी काँग्रेसने साकार केले असून, तेथे परिवर्तन झाले आहे. कोठुरेत सत्तेच्या प्रतीक्षेत असलेल्या राजेंद्र डोखळेना मतदारांनी कौल दिला असला, तरी त्यांच्या पत्नीचा मात्र पराभव झाला. तेथे आशिष मोगल यांचा गट सत्तेत होता. वनसगाव येथे उन्मेष डुंबरें पायउतार करत, राहुल डुंबरे यांच्या संघटित पॅनलने बाजी मारली. सर्वाधिक चर्चेत असलेल्या करंजगाव येथे खंडू बोडके पाटील यांना सत्तेतून पायउतार व्हावे लागले आहे.
दात्याणे येथे भूषण धनवटे यांच्या गटाचा पराभव होऊन सुनील पवार, केदु गवळी यांच्या पॅनलने बाजी मारली आहे. नांदूरमध्यमेश्वर येथे हरिश्चंद्र भवर यांच्या गटाला धोबीपछाड देत, शरद शिंदे गटाने बाजी मारली आहे. शिरवाडे वणीत परिवर्तन होऊन अशोक निफाडे यांच्या गटाला सहा जागा तर शरद काळे यांना ५ जागांवर समाधान मानावे लागले. पिंपरीत मनसेने मुसंडी मारली आहे.
इतर ग्रामपालिकेत उगाव मध्ये पानगव्हाणे, म्हाळसकोरेत संजय शिंदे, आहेरगावात काशीनाथ मोरे, कारसुळ मध्ये देवेंद्र काजळे सपत्नीक, तर उंबरखेडमध्ये सेनेचे भाऊ घुमरे यांचा पराभव करण्यासाठी एकत्र आलेल्या यंत्रणेला अपयश आले असून, तेथे त्यांनी सत्ता कायम राखली आहे.
जेथे परिवर्तन झाले तेथे प्रस्थापितांना विरोध दिसून आला. तालुक्यात बऱ्याच ठिकाणी महाविकास आघाडीला कौल मिळाल्याचे चित्र आहे.