खमताणेचा ‘तो’ व्हिडीओ युट्यूबवर ट्रेडिंगवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:16 AM2021-08-29T04:16:34+5:302021-08-29T04:16:34+5:30
५ ऑगस्ट २०१९ रोजी बागलाण तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात अचानक धुव्वाधार पाऊस पडल्याने आरम नदीला पूर आला. मात्र याच ...
५ ऑगस्ट २०१९ रोजी बागलाण तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात अचानक धुव्वाधार पाऊस पडल्याने आरम नदीला पूर आला. मात्र याच वेळी आरम नदीच्या खमताणे येथील बंधाऱ्यावर मच्छिंद्र पिंपळसे नावाचा युवक पाण्यात अडकून पडतो. मिनिटामिनिटांनी पाणी वाढतच गेल्याने त्या युवकाला पाण्यातून बाहेर पडणे मुश्कील होते. स्थानिक नागरिकांसह पोलीस, महसूल व एनडीआरएफचे पथक यांनी सर्वप्रकारचे प्रयत्न करूनही त्याला बाहेर काढणे अशक्य होते. प्रचंड पाण्यातून त्या युवकाचा जीव वाचविण्याचा शेवटचा प्रयत्न देखील फसल्याने मच्छिंद्र पाण्यात वाहून गेला. मच्छिंद्र पुराच्या पाण्यात वाहून गेला म्हणून त्याच्या कुटुंबीयांनी केलेला आक्रोश आणि त्यानंतर प्रचंड पाण्यातील झाडाला लटकलेला मच्छिंद्र व स्थानिक नागरिक तसेच पोलिसांनी त्या झाडावर फेकलेला दोर आणि त्यानंतर मच्छिंद्रचा वाचलेला जीव या सर्व घटनांचे चित्रीकरण करून हा व्हिडीओ युट्यूब पेजवर प्रसिद्ध करण्यात आला होता.
नाशिकच्या बागलाण तालुक्यातून प्रसिद्ध झालेला हा व्हिडीओ भारतातील २ कोटी १३ लाख ७९ हजार ५७७ युट्यूब युजर्सने पाहिला असून त्यापाठोपाठ पाकिस्तान, दुबई, नेपाळ, सौदी अरेबिया, अमेरिका, बांग्लादेश, इंडोनेशिया आदींसह ५१ देशांमध्ये बागलाण तालुक्याचा व्हिडीओ पोहोचला आहे. या संपूर्ण व्हिडीओचे चित्रीकरण बागलाणचे दीपक सूर्यवंशी, संपादन प्रवीण पवार, एडिटिंग गणेश पवार यांनी केले आहे.