रापलीत बारागाड्या ओढून खंडेराव महाराज यात्रोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2022 01:06 AM2022-03-26T01:06:20+5:302022-03-26T01:06:54+5:30
रापली परिसरात ग्रामदैवत असलेल्या श्री खंडेराव महाराजांच्या यात्रोत्सवानिमित्त फाल्गुन पंचमीच्या शुभमुहूर्तावर बारागाड्या ओढण्याचा कार्यक्रम झाला.
चांदवड : तालुक्यातील रापली परिसरात ग्रामदैवत असलेल्या श्री खंडेराव महाराजांच्या यात्रोत्सवानिमित्त फाल्गुन पंचमीच्या शुभमुहूर्तावर बारागाड्या ओढण्याचा कार्यक्रम झाला. यात्रेचे यंदा ४४ वे वर्ष असून या उत्सव समितीचे संस्थापक कै. काशीनाथ बाबा ढोणे यांच्या प्रेरणेतून सुरू झालेल्या या उत्सवात गावातील नागरिक नकुल राजनोर यांना यंदा बारागाड्या ओढण्याचा मान मिळाला होता. एकूण सहा दिवस चाललेल्या या यात्रोत्सवात जागरण गोंधळाच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामस्थांनी आपापल्या बैलगाड्या आणून नवरदेवाच्या हस्ते मल्हार रथाचे पूजन करण्यात आले. यात्रा कमिटीकडून मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली. ‘यळकोट यळकोट जय मल्हार’, ‘खंडेराव महाराज की जय’ अशा जयघोषात खंडेराव महाराज यात्रेला सुरुवात झाली. दुपारी गावातील आराध्य दैवताचे दर्शन करून अश्व मंदिराकडे नेण्यात आला. कार्यक्रमस्थळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.