खंडोबा यात्रौत्सवाची तयारी पूर्ण
By admin | Published: December 24, 2015 10:30 PM2015-12-24T22:30:35+5:302015-12-24T22:43:31+5:30
पाथरे : आवर्तनानुसार मिळाला गावाला मान
पाथरे : सिन्नर तालुक्यातल्या पाथरे येथील ग्रामदैवत खंडोबा महाराज यात्रौत्सवास शुक्रवार (दि. २५) पासून सुरु होत आहे. यात्रौत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती आयोजकांनी दिली.
श्री दत्त जयंती पासून सुरु होणारा हा यात्रौत्सव आठवडाभर चालतो. पाथरे खुर्द, पाथरे बुद्रुक, वारेगाव या तीन गावांना आवर्तन पध्दतीने यात्रौत्सव साजरा करण्याचा मान मिळतो. यंदा हा मान पाथरे खुर्द गावाला मिळाला आहे. मंदिर व परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. मंदिराजवळील काटेरी झुडूपे तोडून परिसर स्वच्छ व मोकळा करण्यात आला आहे. यात्रेच्या पहिल्या दिवशी खंडोबा महाराज मुर्ती व मुखवट्याची सुशोभित रथातून मिरवणूक काढण्यात येते. रथ सुशोभिकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. गुरुवारी रात्री आठ वाजता गावातून छबीना मिरवणूक काढण्यात येणार आहे. गावातील बुरुजाच्या वाड्यासमोर खंडोबा महाराजांच्या पादुका ठेवून रथाचे पूजन केले जाते. यावेळी धनगर बांधवांच्या वतीने रथाची मिरवणूक काढून डफांच्या तालावर नृत्य केले जाते. शुक्रवारी सकाळी पालखी सोहळा, कावडी व तकतराव (देवाचा गाडा) मिरवणूक होणार असून त्याची तयारी पूर्ण झाली आहे. यंदा आकर्षक कावडीधारकांसाठीही बक्षीसे ठेवण्यात आली आहेत. रविवारी (दि. २७) कुस्त्यांची भव्य दंगल होणार आहे. यावेळी कोल्हापूर, सांगली, पुणे, नाशिक, अहमदनगर आदि जिल्'ांतील नामवंत मल्ल कुस्त्यांमध्ये सहभागी होणार आहेत. मनोरंजनासाठी यंदा मालती ईनामदार, कुंदा पाटील, वसंत नांदवलकर आदि नामवंत कलाकारांचे लोकनाट्य तमाशा कार्यक्रम होणार आहे. परिसरातील सर्वात मोठ्या यात्रोत्सवासाठी पंचक्रोशीतील भाविकांसह धनगर समाज मोठ्या प्रमाणात सहभागी येत असतात. यात्रेत सहभागी होणाऱ्या भाविकांना पिण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाने पाण्याची व्यवस्था केली आहे. यात्रोत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली असल्याची माहिती यात्रा समितीचे अध्यक्ष सुकदेव गुंजाळ यांनी दिली. (वार्ताहर)