खापराळे जिल्हा परिषद शाळेची दूरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2019 06:20 PM2019-06-30T18:20:06+5:302019-06-30T18:21:24+5:30
सिन्नर तालुक्यातील खापराळे येथील जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीची दूरवस्था झाल्याने विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला लागला आहे.
सिन्नर : तालुक्यातील खापराळे येथील जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीची दूरवस्था झाल्याने विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला लागला आहे.
इयत्ता पहिली ते चौथीच्या चार वर्गासाठी सध्या एकच वर्गखोली किमान सुस्थितीत आहे. हे चार वर्ग मिळून त्यांची पटसंख्या इतकी आहे. की हे चारही वर्ग एकाच वर्गखोलीत आळीपाळीने भरतात. नुकतीच तिचीही दुरूस्ती करण्यात आली आहे. परंतु निकृष्ट कामामुळे चिमण्यांनी छताकडे भिंती कोरून घरटे केल्याने तेथे साप येवून बसतात. त्यामुळे विद्यार्थी व शिक्षकांचा जीव धोक्यात आला आहे.
तालुक्यातील खापराळे हे सिन्नरच्या पश्चिम भागात डोंगरावर वसलेले छोटेसे गाव असून, येथे अंगणवाडी आणि इयत्ता पहिली ते चौथी जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आहे. या शाळेसाठी २००५-०६ या आर्थिक वर्षात एक वर्गखोलीचे लाखो रूपये खर्च करून आरसीसी छत बांधकाम केले. अवघ्या अकरा वर्षांतच संबंधित वर्गखाली धोकादायक बनली आहे. पावसाळ्यात वर्गखोलीत पाणीच पाणी होते. स्लॅब पाझरून त्यातील लोखंडी सळ्या गंजल्या आहेत. त्यामुळे बांधकामाचा खर्च पाण्यात गेला आहे. दारे, खिडक्या गंजून त्याचे पापडे पडत असल्याने ते कधीही तुटून पडतील सांगता येत नाही. पावसाळ्यात भिंतीना पाझर येतो. तो पावसाळ्यानंतरही किमान दोन महिने टिकून राहतो. त्यामुळे भिंतीचे अस्तित्व धोक्यात आले आहे. एवढी दुरवस्था असूनही या शाळेतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता मात्र चांगली आहे.
संबंधित मुख्याध्यापकांनी वर्गखोली निर्लेखित करण्याचा प्रस्ताव दिला. मात्र त्यानूसार वर्गखोल्यांचे आयुर्मान पूर्ण न झाल्याने फक्त दुरूस्ती होवू शकते. या पूर्वी अनेकदा प्रस्ताव देवूनही दुरूस्तीसुध्दा होवू शकली नाही. परिणामी या पावसाळ्यातही आणि पुढेही किती दिवस चार इयत्ता एकाच वर्गात आणि वर्गाबाहेर शिक्षणाचे धडे घ्यावे लागतील ते सांगता येणार नाही.