जिल्ह्यात खरीप हंगाम संकटात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2019 10:49 PM2019-10-31T22:49:54+5:302019-10-31T22:50:17+5:30
नाशिक : कळवण तालुक्यांतील ओतूर परिसरात गेल्या चार-पाच दिवसांपासून परतीच्या पावसाने थैमान घातले असून, बळीराजा संकटात सापडला आहे.
नाशिक : कळवण तालुक्यांतील ओतूर परिसरात गेल्या चार-पाच दिवसांपासून परतीच्या पावसाने थैमान घातले असून, बळीराजा संकटात सापडला आहे.
अतिपावसामुळे मका कणसे सडली असून डिर फुटायला लागले आहेत तर बाजरीची कणसे सडली आहेत व कांदा रोपे खराब होत आहेत, त्यामुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाणार असल्याने बळीराजा पुन्हा आर्थिक संकटात सापडला आहे. गेल्या दोन दिवसात परिसरात ढगाळ वातावरण असल्याने पिकांवर बुरशी, मावा रोगांचा फैलाव झाला आहे.
गेल्या वर्षापेक्षा यावर्षी खरीप पिकांची फारच दयनीय अवस्था पिकांची सुरुवाती- पासूनच झाली आहे. त्यातच परतीचा पाऊस व रोगराईची भर पडली आहे. उन्हाळी कांदा रोपे भुईसपाट झाली आहेत. मक्याचा चारा सडला असून, भाजीपाला पिकांचे नुकसान झाले आहे. चार महिने राब राब राबून पिकांसाठी घेतलेल्या कष्टाला पावसाने नुकसान केल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. हजारो रुपये खर्च करून उभी केलेली पिके डोळ्यासमोर भुईसपाट होताना बळीराजा पाहत आहे. काही ठिकाणी सोयाबीन पाण्यात तरंगत आहे तर मक्याचा कणसांना कोंब फुटले आहेत, त्यामुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. तसेच द्राक्षबागा व फळ पिकांचेही नुकसान झाले आहे. अतिवृष्टी झाल्याने पिकांमध्ये गुडघाभर पाणी साचले आहे. पावसाने शेतकरी धास्तावला आहे. शासनाने पंचनामे न करता सरसकट नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी ओतूर परिसरातील शेतकरीवर्गाने केली आहे.