नोटाबंदीमुळे शेतकऱ्यांचा खरीप हंगाम धोक्यात
By admin | Published: May 11, 2017 12:48 AM2017-05-11T00:48:58+5:302017-05-11T00:49:09+5:30
नाशिक : कृषी विभागाने खरीप पीक लागवडीचे क्षेत्र वाढविले असले तरी, यंदा नोटाबंदीचा खरीप हंगामावर परिणाम होण्याचा अंदाज जाणकार व्यक्त करीत आहेत,
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : गतवर्षाप्रमाणेच यंदाही मान्सून सरासरी इतकाच बरसणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केल्यामुळे कृषी विभागाने खरीप पीक लागवडीचे क्षेत्र वाढविले असले तरी, यंदा नोटाबंदीचा खरीप हंगामावर परिणाम होण्याचा अंदाज जाणकार व्यक्त करीत आहेत, त्यासाठी एकट्या नाशिक जिल्हा मध्यवर्ती बॅँकेच्या आर्थिक संकटाचे कारण पुढे करण्यात आले आहे.
गेल्या वर्षी जिल्ह्णात १०२ टक्के पाऊस झाल्याने खरिपाचे अमाप पीक आले, शिवाय जिल्हा बॅँकेने जवळपास २७०० कोटी रुपयांचे पीककर्जाचे वाटप केल्याचा शेतकऱ्यांना फायदा झाला. परिणामी खरिपाची लागवड ६६२१९३ हेक्टर क्षेत्रावर करण्यात आली. सरासरीपेक्षा १०१ टक्के ही लागवड झाल्याने खरिपाच्या ज्वारी, बाजरी, मका, तूर, मूग, उडीद व सोयाबीनच्या उत्पादनात वाढ झाली.
यंदाही मान्सून सामान्य राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने अगोदर व्यक्त केला होता, नंतर मात्र मान्सून सरासरी राहील, असे जाहीर केल्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. कृषी खात्यानेदेखील हवामान खात्याचा अंदाज गृहीत धरून यंदा जिल्ह्णात खरिपाच्या लागवड क्षेत्रात वाढ करण्याचे नियोजन हाती घेतले आहे. साधारणत: ६८६०८० हेक्टर क्षेत्रावर खरिपाचे पीक घेण्याचे ठरविण्यात आले आहे. तथापि, खरीप घेण्यासाठी शेतकऱ्यांना लागणाऱ्या पीक कर्जाबाबत यंदा अनिश्चितता आहे. कृषी खात्याने २८०६ कोटी रुपयांच्या पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट ठरविले आहे व त्यात सर्वाधिक भार जिल्हा बॅँकेवर टाकण्यात आला आहे.
मान्सून तोंडावर म्हणजेच महिन्यावर येऊन ठेपलेला असताना शेतकऱ्यांची खरिपाची लगबग सुरू झाली आहे. खते, बी-बियाणे, औषधे खरेदीसाठी आत्ताच पैशांची गरज भासू लागली आहे. पीककर्जाच्या करण्यात आलेल्या नियोजनापैकी मे महिन्यात जेमतेम ५० कोटी रुपयांचेच वाटप शेतकऱ्यांना पीककर्जापोटी झाले आहे. अशीच परिस्थिती राहिल्यास यंदा अस्मानी मेहेरबानी असूनही शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.