पेठ तालुक्यात २५ हजार हेक्टरवर होणार खरिपाची पेरणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:14 AM2021-05-06T04:14:34+5:302021-05-06T04:14:34+5:30
जिल्ह्याच्या पश्चिमेस गुजरात राज्याच्या सीमेवर वसलेल्या पेठ तालुक्यात भात व नागली ही दोन प्रमुख खरीप पिके घेतली जातात. जवळपास ...
जिल्ह्याच्या पश्चिमेस गुजरात राज्याच्या सीमेवर वसलेल्या पेठ तालुक्यात भात व नागली ही दोन प्रमुख खरीप पिके घेतली जातात. जवळपास दोन हजारांपेक्षा अधिक सरासरी पर्जन्यमान असले तरी गत अनेक वर्षांपासून पावसाच्या अस्थिरतेमुळे सरासरी पर्जन्यमानात मोठ्या प्रमाणावर घट होताना दिसून येत असल्याने उत्पन्नावर त्याचा परिणाम झाला आहे.
भात व नागली या दोन पिकांसाठी पेरणीपूर्व मशागतीची दोन भागात विभागणी केली जात असल्याने राब भाजणी या पेरणीपूर्व तयारीत आदिवासी बळीराजा गुंतला आहे. भात व नागलीची पेरणी करण्यापूर्वी जमीन भाजून तणविरहित केली जाते. पहिल्या पावसासोबत याच राब भाजलेल्या जागेत भात व नागलीचे बियाणे पेरणी केली जाते. सध्या शिवारात पालापाचोळा, गवत, गोवऱ्या, वाळलेल्या झाडाच्या फांद्या टाकून राब भाजली केली जात आहे.
कोट....
हवामान खात्याच्या अंदाजानुसार यावर्षी समाधानकारक पावसाचा अंदाज असल्याने पेठ तालुक्यातील शेतकरी बांधवांच्या मदतीसाठी कृषी विभागाचे सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी खरीप कृती आराखडा तयार केला असून, कोरोनाचा काळ असला तरी खते, बी-बियाणे बांधावर पोहच करण्याचा मानस आहे. शेतकऱ्यांनी कृषी विभागाचा सल्ला व मार्गदर्शन घेऊन उत्तम शेती करावी.
- अरविंद पगारे
तालुका कृषी अधिकारी, पेठ
खरीप पीकनिहाय पेरणी उद्दिष्ट (आकडे हेक्टरमध्ये )
१) भात -११,७९१ २) नागली- ५७५५ ३) वरई -१६९६ ४) तूर -९६३ ५) उडीद-१९९९
६) कुळीद-१०९२ ७) भुईमूग -१५१५ ८) खुरसाणी -६००
फोटो - ०५ पेठ १
पेठ तालुक्यात खरीप पेरणीपूर्व मशागतीसाठी राब भाजणी करताना शेतकरी.