नस्त्यांचा ढिगारा, परिपत्रकांचा ‘खच’
By admin | Published: July 8, 2017 12:00 AM2017-07-08T00:00:19+5:302017-07-08T00:00:42+5:30
नाशिक : जिल्हा परिषदेत प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यात ‘अंतर’ कमी होण्याऐवजी वाढतच आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : जिल्हा परिषदेत प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यात ‘अंतर’ कमी होण्याऐवजी वाढतच असून, मुख्यालयातील कर्मचारी व अधिकाऱ्यांना कामकाजाची शिस्त लावण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीना एकीकडे रोज नवनवीन परिपत्रकांचा पाऊस पाडत आहे, तर दुसरीकडे त्यांच्याकडे प्रलंबित नस्त्यांचा ढिगारा वाढतच चालला आहे.
दरम्यान, आपले कार्यालय झिरो पेंडसीनुसारच कामकाज करीत असल्याचा दावा मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीना यांनी अध्यक्ष शीतल उदय सांगळे यांच्याकडे केला आहे. ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या सर्वाधिक नस्त्या मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालयाकडे प्रलंबित असल्याचा आरोप करण्यात येत आहे. निफाड तालुक्यातील शिवापूर गावच्या पाणीपुरवठा योजनेची दुसरा हप्ता निधी देण्याची नस्ती मुख्य लेखा व वित्त अधिकारी कार्यालयाने २६ एप्रिलला आणि मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालयाने १६ जूनला मंजूर केलेली असताना अजूनही संबंधित ग्रामपंचायतीस निधी वितरणाचा दुसरा हप्ता मिळण्याची प्रतीक्षा आहे. अध्यक्ष शीतल सांगळे यांनी दीपककुमार मीना यांच्या त्यांच्या कक्षात बोलावून घेत शिवापूरसह एकूणच प्रलंबित नस्त्यांबाबत विचारणा केली. काही शिक्षक बदल्यांच्या नस्तीही पडून असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. लवकरात लवकर फाइलींचा निपटारा करा, असे आदेशच शीतल सांगळे यांनी यावेळी दीपककुमार मीना यांना केले. त्यावर आपले कार्यालय झिरो पेन्डसीनुसारच कामकाज करीत असल्याचा दावा त्यांनी केल्याचे समजते.