बिटको चौकात खड्डेच खड्डे...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2018 12:34 AM2018-08-22T00:34:06+5:302018-08-22T00:34:24+5:30
रहदारीची मोठी वर्दळ असलेल्या बिटको चौकात रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने वाहतुकीची मोठी कोंडी होत आहे. मनपा प्रशासनाकडून मुरूम टाकून तात्पुरते खड्डे बुजविले जात असल्याने पावसामुळे पुन्हा एका दिवसात जैसे थे परिस्थिती होत आहे.
नाशिकरोड : रहदारीची मोठी वर्दळ असलेल्या बिटको चौकात रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने वाहतुकीची मोठी कोंडी होत आहे. मनपा प्रशासनाकडून मुरूम टाकून तात्पुरते खड्डे बुजविले जात असल्याने पावसामुळे पुन्हा एका दिवसात जैसे थे परिस्थिती होत आहे. सकाळपासून रात्रीपर्यंत दिवसभर मोठी वर्दळ असलेल्या बिटको चौकातील गोलाकार वाहतूक बेटाभोवती मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहे. यामुळे चहुबाजूचे सिग्नल सुटल्यावर वाहने निघून जाण्याऐवजी खड्ड्यांमुळे अडखळत असल्याने वाहतुकीची मोठी कोंडी होत आहे. त्यामुळे एक सिग्नल सुटल्यावर तेथून येणारी वाहने बिटको चौकातून निघून जाण्यापूर्वीच दुसरा सिग्नल सुरू होत असल्याने वाहतुकीच्या कोंडीबरोबर अपघात होण्याची दाट शक्यता आहे. खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचत असल्याने खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने वाहने आदळून नुकसान होत आहे. तर दुचाकी स्लिप होण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे वाहनधारकासोबत वाहतूक पोलीसदेखील वैतागले आहेत. बिटको चौकात रस्त्यावर पडलेले खड्डे मनपा प्रशासनाकडून मुरूम टाकून तात्पुरत्या स्वरूपात बुजविले जात आहे. मात्र पावसाच्या रिपरिपमुळे व एकसारख्या येणाऱ्या-जाणाºया वाहनांमुळे खड्ड्यातील मुरूम वाहून जात पुन्हा खड्ड्याची जैसे थे परिस्थिती होत आहे. बिटको चौकातील रहदारीची वर्दळ लक्षात घेऊन मनपा प्रशासनाने रस्त्यावर पडलेले खड्डे व्यवस्थित बुजवावे, अशी मागणी वाहनधारकांनी केली आहे.