ख्याल गायकीत रसिक तल्लीन !
By admin | Published: January 11, 2015 12:17 AM2015-01-11T00:17:26+5:302015-01-11T00:29:33+5:30
अखंड ख्याल संकीर्तन : पन्नास कलावंत आले एकत्र
नाशिक : कोणाचा राग तोडी, तर कोणाचा अहिर भैरव, कोणाची जयपूर घराण्याची अदाकारी, तर कोणाची ग्वाल्हेर घराण्याची पेशकश... एकाहून एक सरस अशा ख्याल गायकीची पर्वणी नाशिककरांना लाभली. निमित्त होते अखंड ख्याल संकीर्तनाचे. कुसुमाग्रज स्मारकात शनिवारी या महोत्सवाला प्रारंभ झाला.
कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाचे हे दुसरे वर्ष आहे. यानिमित्ताने शहरातील शास्त्रीय गायन-वादन क्षेत्रातील सुमारे पन्नास नवोदित व ज्येष्ठ कलावंत एकत्र आले आहेत. ज्येष्ठ गायक शशिकांत मुजुमदार व यशवंत खाडिलकर यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन झाले. कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष किशोर पाठक, प्रमुख कार्यवाह लोकेश शेवडे, गायक मकरंद हिंगणे यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रारंभी देवश्री नवघरे यांनी तोडी राग सादर केला. त्यानंतर जाई सराफ यांनी अहिर भैरव, प्रसाद दुसाने यांनी भैरव, शरद नवघरे यांनी शिवमत भैरव, श्रीराम तत्त्ववादी यांनी शुद्ध सारंग, देविका काशीकर यांनी जौनपुरी राग पेश केला. त्यांना आनंद अत्रे, सागर कुलकर्णी, कल्याणी दसककर, ईश्वरी दसककर, दिव्या रानडे, प्रसाद गोखले, कल्याणी दसककर यांनी अनुक्रमे संवादिनीची, तर सुजित काळे, जयेश कुलकर्णी, प्रमोद भडकमकर, दिगंबर सोनवणे, नितीन पवार, प्रमोद भडकमकर, गौरव तांबे यांनी तबल्याची साथ दिली.
दुसऱ्या सत्रात वीणा गोखले, अश्विनी भार्गवे, सुनील देशपांडे, कल्याणी दसककर, रागेश्री वैरागकर, आनंद अत्रे यांनी गायन केले. त्यांना अनुक्रमे प्रसाद गोखले, कल्याणी दसककर, सागर कुलकर्णी, ईश्वरी दसककर, जगदेव वैरागकर, दिव्या रानडे, सुभाष दसककर यांनी संवादिनीची, तर गिरीश पांडे, सुजित काळे, दिगंबर सोनवणे, रसिक कुलकर्णी, नितीन वारे आदिंनी तबल्याची साथसंगत केली. आशिष रानडे यांनी सूत्रसंचालन केले.