बारागावपिंप्री महाविद्यालयात खो-खो स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2018 12:43 AM2018-09-03T00:43:51+5:302018-09-03T00:44:56+5:30
सिन्नर : साने गुरूजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कला व वाणिज्य महाविद्यालय बारागाव पिंप्री येथे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत सन २०१८-१९ मधील नाशिक विभागीय मुलींच्या खो-खो स्पर्धा उत्साहात पार पडल्या.
सिन्नर : साने गुरूजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कला व वाणिज्य महाविद्यालय बारागाव पिंप्री येथे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत सन २०१८-१९ मधील नाशिक विभागीय मुलींच्या खो-खो स्पर्धा उत्साहात पार पडल्या.
स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष गणपत मुठाळ, खजिनदार मिलिंद पांडे, प्राचार्य डॉ. डी.एल. फरताळे, नाशिक विभागीय क्रीडा समितीचे उपसचिव डॉ. नरेंद्र पाटील, नाशिक शहर क्रीडा उपसचिव डॉ. मीनाक्षी गवळी, डॉ. हेमंत पाटील, प्रा. आर.एच. तेलुरे आदी यावेळी उपस्थित होते.
पुरातन काळापासून तत्कालीन संस्कृतीत खेळाचा उल्लेख सापडतो. व्यक्तिमत्त्व विकासात खेळाला महत्त्व आहे. विद्यार्थ्यांची क्रीडेत रुची वाढावी, त्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी क्रीडा स्पर्धा घेणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन अध्यक्ष गणपत मुठाळ यांनी व्यक्त केले.
विद्यार्थ्यांनी यश गाठण्यासाठी सतत क्रियाशील राहिले पाहिजे, आकाशात उंच उडण्याचे ध्येय ठेवायला हवे, ते ध्येय गाठण्यासाठी यशामागे धावायला हवे, धावायला नाही जमले तर चालायला तरी हवे आणि चालायला नाही जमले तर उभं राहायला तरी शिकलं पाहिजे असे सांगून सतत प्रयत्नशील राहण्याचा सल्ला प्राचार्य डॉ. फरताळे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना दिला.
डॉ. नरेंद्र पाटील यांनी महाविद्यालयाच्या उत्कृष्ट संयोजनाबद्दल महाविद्यालयाचे कौतुक केले. या स्पर्धेसाठी मालेगाव, पेठ, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर, वणी, खेडगाव, नाशिक, निफाड, सटाणा यांच्यासह जिल्ह्यांमधील २५ संघ सहभागी झाले होते. चुरशीच्या झालेल्या अंतिम सामन्यात नाशिकच्या के.टी.एच.एम. महाविद्यालयाने विजेतेपद पटकावले. श्रीरामपूर येथे जिल्हा स्तरावर होणाऱ्या खो-खो स्पर्धेसाठी बारागाव पिंप्री महाविद्यालयातील सुजाता उगले हिची निवड करण्यात आली.
याप्रसंगी सरपंच योगेश गोराडे, विजय उगले, उत्तम उगले, अरूण गांगवे, न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य बागुल उपस्थित होते. प्रास्ताविक मंजुश्री उगले यांनी केले. ललित गांगुर्डे यांनी सूत्रसंचालन केले. वृषाली उगले यांनी आभार मानले.