खोडेनगर : विठ्ठल रूखमाई मंदिरातील ‘आषाढी उत्सव’ रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2020 08:03 PM2020-06-30T20:03:22+5:302020-06-30T20:06:27+5:30
कोरोना आजाराचे संक्रमण टाळण्यासाठी मंदिरात सालाबादप्रमाणे यंदा बुधवारी आषाढीनिमित्त कुठलेही कार्यक्रम होणार नाही.
नाशिक : वडाळागाव शिवारातील श्री विठ्ठल रूखमाई मंदिरात दरवर्षीप्रमाणे आषाढी एकादशीला होणारा उत्सव यावर्षी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार रद्द करण्यात आला आहे. यंदा कुठल्याहीप्रकारचा सार्वजनिक धार्मिक कार्यक्रम घेतला जाणार नसून पहिल्या लॉकडाऊनपासून मंदिर भाविकांसाठी बंद ठेवण्यात आले असून ते बुधवारी (दि.१) बंदच राहणार असल्याचे विश्वस्त सुनील माधव खोडे यांनी सांगितले.
कोरोना आजाराचे संक्रमण टाळण्यासाठी मंदिरात सालाबादप्रमाणे यंदा बुधवारी आषाढीनिमित्त कुठलेही कार्यक्रम होणार नाही. केवळ ध्वनीमर्यादेचे पालन करत अभंगवानी सुरू ठेवली जाईल आणि सकाळी तीन व्यक्तींच्या उपस्थितीत काकडा आरती व पूजाविधी केला जाणार आहे. यावेळी परिसरातील कोणत्याही भक्तांना मंदिरात प्रवेशास मनाई करण्यात आली आहे. याबाबतची माहिती विश्वस्त मंडळाकडून मुंबईनाका पोलीस ठाण्यालाही कळविण्यात आली आहे. खोडेनगर, अशोकामार्ग, रविशंकर मार्ग, डीजीपीनगर-१, वडाळागाव या संपुर्ण भागात येथील हे एकमेव विठ्ठल रूखमाई मंदीर आहे. मंदिरावर आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. तसेच सभामंडपापासून गाभा-यापर्यंतदेखील उत्कृष्ट सजावट करण्यात आली आहे. मंदिरातील विठूमाऊलीच्या मुर्तीचे दर्शन विश्वस्त मंडळाकडून परिसरातील नागरिकांना सोशलमिडियाद्वारे करून देण्याचा प्रयत्न युवा कार्यकर्ते करणार आहेत. मंदिराच्या परिसरात यंदा भाविकांनी सामाजिक भान राखत दर्शनासाठी येऊ नये. आपआपल्या घरातूनच पांडूरंगाला ‘कोरोना’चे संकट दूर करण्याचे साकडे घालावे, असे आवाहन विश्वस्त मंडळाने केले आहे.