खोकरतळेवासीयांनी कोरोनाला रोखले वेशीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:14 AM2021-05-18T04:14:39+5:302021-05-18T04:14:39+5:30
पेठ : कोरोनावर मात करण्यासाठी योग्य शासकीय नियमांचे पालन, ग्रामपंचायत प्रशासनाकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजना व जनजागृती या त्रिसूत्रीचा ...
पेठ : कोरोनावर मात करण्यासाठी योग्य शासकीय नियमांचे पालन, ग्रामपंचायत प्रशासनाकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजना व जनजागृती या त्रिसूत्रीचा वापर करून पेठ शहरापासून अवघ्या पाच किलोमीटर वर असलेल्या खोकरतळे या गावाने गत दीड वर्षांपासून कोरोनाला गावात शिरकाव करू दिला नाही.
खोकरतळे गावाची लोकसंख्या १,४९० असून, मागील वर्षी मार्च महिन्यात देशात कोरोनाचा शिरकाव झाल्यावर कोणत्याही शासकीय आदेशाची वाट न पाहता गावपातळीवर उपाययोजना करून, ग्रामपंचायतीमार्फत प्रथम गावांतील नागरिकांना कोरोना विषाणू व त्याच्या प्रसाराबाबत माहिती देऊन जनजागृती केली. गावातील लोकांना बाहेर जावे लागू नये, सोशल नेटवर्किंग फोरम या संस्थेच्या माध्यमातून १०० कुटुंबांना किराणा साहित्य मोफत उपलब्ध करून दिले. गावात जंतुनाशक फवारणीसह प्रत्येक कुटुंबाला साबण, सॅनिटायझर वाटप करण्यात आले. अंगणवाडीसेविका, आशा स्वयंसेविका यांच्या माध्यमातून प्रत्येक माणसाची आरोग्य तपासणी करून वेळीच उपचार घेतले. संशयित रुग्णांची नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणी करून घेण्यात आली.
------------------
खोकरतळे गावात ग्रामपंचायतीकडून योग्य उपाययोजना व नागरिकांनी दिलेली साथ, यामुळे गाव कोरोनापासून सुरक्षित आहे. दुसऱ्या लाटेतही गावात आवश्यक उपाययोजना केल्या जात असल्याने, गाव कोरोनामुक्त ठेवण्यात नागरिक व ग्राम पंचायत प्रशासनाला यश आले आहे.
- चंद्रभागा मोंढे, सरपंच, खोकरतळे
===Photopath===
170521\17nsk_1_17052021_13.jpg
===Caption===
१७ पेठ १