अवघ्या २४ तासांत अपहृत मुलाचा शोध
By admin | Published: October 26, 2016 12:06 AM2016-10-26T00:06:08+5:302016-10-26T00:06:57+5:30
थरारनाट्य : विवाहासाठी दिलेले पैसे मिळत नसल्याने केले अपहरण
नाशिक : तीन वर्षांपूर्वी मित्राला विवाहासाठी दिलेले उसनवार पैसे परत मिळत नसल्याने त्याचा दीड वर्षीय मुलगा ‘अथर्व’चे अपहरण केल्याची घटना जेलरोडवरील एमएसईबी कॉलनीत घडली होती़ पोलिसांनी अवघ्या चोवीस तासांत या अपहृत मुलाची अपहरणकर्त्याच्या तावडीतून सुटका केल्याची माहिती पोलीस आयुक्त डॉ़ रवींद्र सिंघल यांनी सोमवारी (दि़२४) पत्रकार परिषदेत दिली. याप्रकरणी संशयित किशोर बाळासाहेब गोडसे (२५, रा. संसरीगाव) यास अटक करण्यात आली असून, न्यायालयाने त्यास दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे़
सिंघल यांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित किशोर गोडसे व सतीश विध्वंस हे दोघे मित्र आहेत़ २०१३ मध्ये किशोर याने सतीशला विवाहासाठी ४० हजार रुपये उसनवार दिले होते़ सतीशने हे पैसे जसजसे येतील तसतसे परत करावे, असे ठरले होते़ मात्र, गत तीन महिन्यांपासून किशोर हा रात्री-अपरात्री पैसे मागण्यासाठी घरी येत होता़ मात्र पैसे नसल्याने सतीश ते देण्यास असमर्थ होता़ शुक्रवारी (दि़२१) रात्री आठ वाजेच्या सुमारास किशोर हा नेहमीप्रमाणे पैसे मागण्यासाठी गेला असता सतीशची पत्नी आपल्या दीड वर्षाचा मुलगा अथर्वला बाहेर खेळवत होती़ अथर्वला चॉकलेट घेऊन देतो असे सांगून किशोर घेऊन गेला तो परत आलाच नाही़ त्यामुळे सतीश व त्याची पत्नी या दोघांनीही बसस्थानक, रेल्वेस्थानक परिसरात शोध घेतला, मात्र हे दोघेही न सापल्याने शनिवारी (दि़२२) उपनगर पोलीस ठाणे गाठून अथर्वचे अपहरण झाल्याची फिर्याद दिली़ पोलिसांनी या तक्रारीची तत्परतेने दखल घेत शहरातील नाशिकरोड, सीबीएस, त्र्यंबेकश्वर, पंचवटी, तपोवन, सोमेश्वर अशा विविध ठिकाणी शोध घेतला मात्र किशोर सापडला नाही़ त्यात रविवारी (दि.२३) दुपारच्या सुमारास संशयित किशोरने सतीशला फोन करून बँक खात्यात ६५ हजार रुपये जमा न केल्यास अथर्व परत मिळणार नाही, अशी धमकी दिली़ विध्वंस दाम्पत्याने ही बाब पोलिसांना सांगताच सायबर क्राइम लॅबची मदत घेऊन त्याचा शोध घेण्यात आला़ मात्र किशोरने ज्या मोबाइलवरून फोन केला तो मोबाइल एका मुलाचा होता व त्यास याबाबत माहिती नव्हते़
पोलिसांनी पुन्हा शहरातील विविध ठिकाणी शोध घेतला मात्र किशोर व अथर्व हे सापडले नाही़ अखेर रात्री १०.३० वाजेच्या सुमारास सीबीएस बसस्थानकाबाहेरील अंधारात संशयित किशोर आणि अथर्व हे दोघेही बसलेले असल्याचे पोलिसांना आढळले. पोलिसांनी या दोघांनाही ताब्यात घेऊन अथर्वला आई-वडिलांकडे सुपूर्द केले़ ही कामगिरी उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत, सहायक पोलीस निरीक्षक श्रीराव, पोलीस उपनिरीक्षक शिंदे, साळवे, पोलीस हवालदार शिंदे, मांदळे, गवांदे, भावले यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली केली़ (प्रतिनिधी)