तीन वर्षीय बालकासह अपहरणकर्ता जेरबंद सिन्नर : स्थानिक गुन्हे शाखा व सिन्नर पोलिसांची कामगिरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:15 AM2021-02-11T04:15:28+5:302021-02-11T04:15:28+5:30
मंगळवारी (दि. ९) दुपारी साडेचारच्यासुमारास इगतपुरी रेल्वे स्टेशनवर बालकासह संशयितास पोलिसांनी ताब्यात घेतले. तब्बल तीन दिवसानंतर साहील नितीन शिरसाठ ...
मंगळवारी (दि. ९) दुपारी साडेचारच्यासुमारास इगतपुरी रेल्वे स्टेशनवर बालकासह संशयितास पोलिसांनी ताब्यात घेतले. तब्बल तीन दिवसानंतर साहील नितीन शिरसाठ या चिमुकल्याची भेट होताच शिरसाठ कुटुंबीयांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले.
रविवारी (दि. ७) दुपारी तीनच्यासुमारास शंकर सहा या संशयिताने सिन्नर शहरातील नायगाव वेस भागातून साहीलचे अपहरण केले होते. सोमवारी दुपारी या बालकाची आई कविता हिने सिन्नर पोलिसात तक्रार नोंदविल्यानंतर पोलीस उपअधीक्षक सोमनाथ तांबे, सिन्नरचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पाच तपासी पथके तयार करून वेगवेगळ्या दिशेने शोधासाठी पाठविण्यात आली होती. मंगळवारी सकाळी ९ च्या सुमारास शंकरने त्याचा मित्र जंबू मिस्तरी यास एका मोबाईलवरून फोन करून मुलाच्या आईशी बोलण्याची इच्छा व्यक्त केली. सिन्नर पोलिसांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी जंबू मिस्तरीचा मोबाईल ताब्यात घेऊन या बालकाच्या आईचे शंकरशी बोलणे करून दिले. त्यानंतर पोलिसांनी शंकरच्या सांगण्यावरून या मुलाच्या आईला घेऊन नाशिकचे सीबीएस बसस्थानक गाठले. नंतर याच क्रमांकावर पोलिसांनी संपर्क साधला असता, एका व्यक्तीने आपल्याकडून मोबाईल घेऊन फोन लावल्याचे या व्यक्तीने सांगितल्याने पोलिसांपुढे तपासाचे आव्हान निर्माण झाले. दरम्यानच्या काळात अन्य एका मोबाईल क्रमांकावरुन जंबू मिस्तरीच्या मोबाईलवर शंकरने संपर्क साधत या मुलाच्या आईस नाशिक रोड रेल्वे स्टेशनवर थांबण्यास सांगितले. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक के. के. पाटील, सहायक पोलीस निरीक्षक वाघ, हवालदार प्रीतम लोखंडे, नीलेश कातकडे यांची टीमही समांतर तपास करीत होती. सिन्नर पोलीस नाशिक रोड रेल्वे स्टेशनवर या मुलाच्या आईला घेऊन थांबून होते, तर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक अंदाजाने इगतपुरी रेल्वे स्टेशनवर पोहोचले. तेथे दुपारी साडेचारच्यासुमारास संशयित शंकर मुलासह स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाच्या ताब्यात आला. पोलिसांनी त्यास मुलासह ताब्यात घेत सिन्नर पोलिसांच्या स्वाधीन केले. याप्रकरणी पोलिसांनी संशयित शंकर छोटेलाल साह (३३, रा. भैसा, जि. मथुरा, उत्तर प्रदेश) यास ताब्यात घेत अटक केली आहे.