किड्स प्लॅनेट प्री स्कूल स्वीकारणार गोग्रास,
By admin | Published: November 5, 2014 12:31 AM2014-11-05T00:31:08+5:302014-11-05T00:37:22+5:30
निर्माल्यग्रीन इंडिया, क्लीन इंडिया : स्वच्छता अभियानात सहभाग
नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘ग्रीन इंडिया-क्लीन इंडिया’चा नारा दिला आणि हा आवाज नाशिकमधील दुसऱ्या मोदींनी ऐकत आगळ्यावेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून स्वच्छता अभियानात आपला सहभाग दर्शविला. नाशिकरोड येथील किड्स प्लॅनेट प्री स्कूल या शाळेने पत्रके छापून गोग्रास आणि निर्माल्य स्वीकारण्याची तयारी दाखविली आहे. त्यासाठी शाळेच्या वतीने नुकतेच स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
किड्स प्लॅनेट प्री स्कूल ही शाळा नुकतीच नव्याने सुरू झाली आहे. पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या आवाहनानंतर आपणही स्वच्छतेत खारीचा वाटा उचलावा, यासाठी शाळेने निर्माल्य आणि गोग्रास स्वीकारण्याचा उपक्रम सुरू केला आहे. नागरिकांनी गाईचा नैवेद्य अथवा शिळे अन्न रस्त्यावर नेऊन ठेवण्याऐवजी, तसेच देव्हाऱ्यातील निर्माल्य नदीत टाकण्याऐवजी ते शाळेकडे आणून द्यावे. त्याचा वापर नैसर्गिक खत निर्मितीसाठी केला जाणार आहे. या उपक्रमाबाबत लोकांना आवाहन करणारी पत्रके शाळेने छापली असून, ती घरोघरी वाटली जात आहेत. या उपक्रमाची सुरुवात फेम सिग्नलवर मानवी साखळी करून झाली. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी हाती फलक घेऊन लोकांना स्वच्छतेविषयी आवाहन केले. याप्रसंगी स्वच्छतेसाठी विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी करित जनजागृती केली.
या उपक्रमात शाळेच्या मुख्याध्यापक निरुपमा मोदी यांच्यासह शिक्षक, पालकवर्ग सहभागी झाला होता. (प्रतिनिधी)