पूररेषा कमी करण्यासाठी किकवी धरणाचा पर्याय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2020 10:18 PM2020-09-28T22:18:10+5:302020-09-29T01:14:50+5:30
नाशिक- शहराच्या वाढीव लोकसंख्येची गरज लक्षात घेऊन प्रस्तावित केलेले किकवी धरण त्वरीत बांधावे, सदरचे धरण बांधल्यास नाशिक शहराची पुरपातळी तीस मिटर ...
नाशिक- शहराच्या वाढीव लोकसंख्येची गरज लक्षात घेऊन प्रस्तावित केलेले किकवी धरण त्वरीत बांधावे, सदरचे धरण बांधल्यास नाशिक शहराची पुरपातळी तीस मिटर कमी होऊ शकते असा दावा जलचिंतन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र जाधव यांनी केला आहे. यासंदर्भात राष्टÑवादी कॉँग्रेसच्या जलचिंतन सेलच्या वतीने पालकमंत्री छगन भुजबळ यांना साकडे घालण्यात आले आहे.
नाशिक शहराच्या वाढीव पाणी पुरवठ्यासाठी राज्य शासनाने किकवी धरण प्रस्तावित केले होते. त्यावेळी राज्यात राष्टÑवादी कॉँग्रेस पक्षाची सत्ता होती. त्यानंतर मात्र गेल्या भाजप सरकारने धरणाचा प्रस्ताव रद्द केला आहे. आता ते धरण बांधावे यासाठी जलचिंतनने पालकमंत्री छगन भुजबळ यांना निवेदन देऊन साकडे घातले आहे. नाशिक शहरात २००८ मध्ये महापूर आला होता. त्यामुळे महापालिकेने पाटबंधारे विभागामार्फत पूररेषा आखली आहे.
ही पुररेषा आखल्याने हजारो मिळकती मातीमोल झाल्या आहेत. त्या पाश्वर्भूमीवर पूररेषा कमी करण्याची मागणी आहे. त्यावर अजूनही निर्णय झालेला नाही. मात्र, ही पुररेषा कमी करण्यासाठी किकवी धरण उपाय होऊ शकते.
या छोट्या धरणामुळे शहराला २ हजार दश लक्ष घन फुट पाणी अतिरीक्त उपलब्ध होईलच शिवाय तीस मीटरने पूररेषा कमी होईल असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. निवेदन देतेवेळी डी. सी. पाटील, किशोर गायकवाड, जयाताई बच्छाव आदी उपस्थित होते.