बिबट्याच्या हल्ल्यात तीन शेळ्या ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2019 06:14 PM2019-04-28T18:14:44+5:302019-04-28T18:15:50+5:30
सिन्नर तालुक्यातील चापडगाव शिवारात भोजापूर धरणक्षेत्रातील असणाऱ्या सांगळे वस्तीवर शुक्रवारी मध्यरात्री बिबट्याने केलेल्या हल्ल्यात दोन शेळ्या व एक बकरू मृत्युमुखी पडल्याची घटना घडली.
सिन्नर : तालुक्यातील चापडगाव शिवारात भोजापूर धरणक्षेत्रातील असणाऱ्या सांगळे वस्तीवर शुक्रवारी मध्यरात्री बिबट्याने केलेल्या हल्ल्यात दोन शेळ्या व एक बकरू मृत्युमुखी पडल्याची घटना घडली.
धर्मेंद्र विठ्ठल सांगळे यांची भोजापूर धरणालगत डोंगराच्या पायथ्याशी वस्ती आहे. रात्री नेहमीप्रमाणे जनावरे गोठ्यात व शेळ्या घराशेजारच्या शेडमध्ये बांधून ते झोपी गेले होते. मध्यरात्री १२.३० वाजेच्या सुमारास अचानक शेळ्यांच्या ओरडण्याच्या आवाजाने सांगळे यांना जाग आली. कुटुंबातील सदस्यांना झोपेतून उठवत त्यांनी बाहेर धाव घेतली. शेडभोवती असलेला प्लॅस्टिक कागद बिबट्याने फाडून आत प्रवेश केला होता. सांगळे घरातून बाहेर आल्याची चाहूल लागल्याने बिबट्याने शेजारच्या शेतातून डोंगराकडे धाव घेतली. सांगळे कुटुंबीय शेडकडे आले असता दोन गाभण शेळ्या व एका बकराच्या नरडीचा घोट घेऊन बिबट्याने त्यांना ठार मारल्याचे दिसून आले. रात्र जागून काढत या कुटुंबाने आजूबाजूच्या वस्त्यांवरील शेतकऱ्यांना सावध केले. सकाळी वनकर्मचारी वसंत आव्हाड यांनी घटनास्थळी पाहणी केली व वरिष्ठांना कळविले.
वनविभागाच्या पथकाने पशुवैद्यकीय अधिकाºयांसमवेत मृत जनावरांचा पंचनामा केला. या घटनेत सांगळे यांचे अंदाजे ३५ हजारांचे नुकसान झाले आहे. वनविभागाच्या वतीने शेतकºयांना सावध राहण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, सदर परिसरात पिंजरा लावण्यात आला आहे.