नाशिक शहरात हत्यासत्र वाढताच पेट्रोल पंपावरील पोलीस बंदोबस्त हटवला
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2021 10:43 AM2021-11-27T10:43:20+5:302021-11-27T10:43:51+5:30
नाशिक शहरात गेल्या चार दिवसात तीन खून झाले आहेत एकापाठोपाठ एक सुरू झालेल्या खुनांमुळे शहर हादरले आहे.
नाशिक - हेल्मेटधारी दुचाकीस्वारांनाच पेट्रोल देण्याची पेट्रोल पंप चालकांना सक्ती करून त्याच्या अंमलबजावणीसाठी थेट पंपांवर तैनात करण्यात आले होते. मात्र, एकीकडे पंपावर हेल्मेट सक्तीसाठी मनुष्यबळ वाया जात असताना दुसरीकडे शहरात हत्यासत्र वाढल्याने पोलिस आयुक्तांवर टीका होत आहे. त्यामुळेच, पेट्रोल पंपावरील पोलीस कर्मचारी कमी करण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला आहे. या संदर्भात लिखित स्वरूपात आदेश नसले तरी पेट्रोल चालकांना तसे कळवण्यात आल्याचे समजते.
नाशिक शहरात गेल्या चार दिवसात तीन खून झाले आहेत एकापाठोपाठ एक सुरू झालेल्या खुनांमुळे शहर हादरले आहे. एकीकडे शहरात गुन्हेगार हैदोस घालत असताना दुसरीकडे मात्र पोलीस यंत्रणा पेट्रोल पंपावर येणाऱ्या दुचाकीस्वारांनी हेल्मेट घातले किंवा नाही हे तपासण्यासाठी व्यस्त आहे. पेट्रोल पंपावर येणाऱ्या नागरिकांनी हेल्मेट परिधान करावे यासाठी पोलीस आयुक्तांनी सक्तीचे आदेश काढले होते. तसेच प्रत्येक पंपावर कर्मचारी तैनात केले होते, हेल्मेट परिधान करण्याची सक्ती असली तरी पंपावर सक्ती, बाहेर रस्त्यावर काय? असा प्रश्न निर्माण झाला होता. त्यातच शहरात गुन्हेगारी वाढल्याने टीकेचा विषय झाला होता.
लोकमतनेही याबाबत नागरिकांच्या भावना मांडल्या होत्या. काल सातपूर येथे भाजपाचा पदाधिकारी असलेल्या अमोल ईघे यांची हत्या करण्यात आल्यानंतर शहरातील गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. त्यामुळेच पेट्रोल पंपावर पोलीस मात्र रस्त्यावर गुन्हेगारांचा हैदोस, अशा प्रकारची टीका सुरू झाल्याने अखेरीस पोलीस आयुक्तांनी हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे. पोलीस आयुक्तालयातर्फे पंपावरील मनुष्यबळ कमी करण्याचा आदेश अद्याप काढण्यात आलेला नाही. मात्र, आज अनेक पंपावर पोलीस आलेले नाही आणि काही पेट्रोल पंप चालकांना तसे कळविण्यात आल्याचे समजते.