माळेगाव औद्योगिक क्षेत्रात कामगार युवकाची हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2017 01:09 AM2017-10-14T01:09:44+5:302017-10-14T01:09:50+5:30
माळेगाव औद्योगिक वसाहतीत कारखान्यात कामावर जात असताना २३ वर्षीय युवा कामगारावर हल्लेखोराने धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची घटना दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली.
सिन्नर : माळेगाव औद्योगिक वसाहतीत कारखान्यात कामावर जात असताना २३ वर्षीय युवा कामगारावर हल्लेखोराने धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची घटना दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली. सिन्नरच्या विजयनगर भागात राहणारा शिवा तुकाराम जगताप (२३) हा युवा कामगार दुपारी अडीच वाजता माळेगाव औद्योगिक वसाहतीतल्या एफडीसी कारखान्यात दुपारच्या सत्रात कामावर निघाला होता. आपल्या मित्रासमवेत तो दुपारी अडीच वाजता कारखान्यासमोर दुचाकीहून उतरला. त्याचवेळी हल्लेखोराने धारदार शस्त्राने शिवा याच्यावर वार केले. त्यानंतर हल्लेखोर पसार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. शिवा रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर त्यास वाहनातून सिन्नर येथील सिद्धिविनायक रुग्णालयात आणण्यात आले; मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता, अशी माहिती डॉ. दिलीप गुुरुळे यांनी दिली. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक हरिभाऊ कोल्हे यांच्यासह पोलीस कर्मचाºयांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. दरम्यान, शवविच्छेदन करण्यासाठी सिन्नर पालिका रुग्णालयात मृतदेह आणण्यात आला होता. मृत शिवाचे वडील तुकाराम जगताप यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित विशाल सांगळे (पूर्ण नाव माहित नाही), रा. माळेगाव याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित फरार
आहे.