बोरगाव-बर्डीपाडा महामार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2020 09:52 PM2020-09-26T21:52:34+5:302020-09-27T00:40:26+5:30
सुरगाणा : बोरगाव ते बर्डीपाडा या महामार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडल्याने या रस्त्याची दुरवस्था झाली असून याचा त्रास वाहनचालकांना होत आहे.
सुरगाणा : बोरगाव ते बर्डीपाडा या महामार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडल्याने या रस्त्याची दुरवस्था झाली असून याचा त्रास वाहनचालकांना होत आहे.
गुजरात राज्याला जोडणारा बोरगाव - सुरगाणा - बर्डीपाडा हा आंतरराज्य महामार्ग आहे. या महामार्गावर दररोज शेकडो वाहनांची ये-जा सुरू असते. या पावसाळ्यात महामार्गावर असंख्य ठिकाणी लहान - मोठे खड्डे पडल्याने या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या मार्गावरील चिराई घाट, बुबळी फाटा, तहसिल, लहान भोरमाळ जवळील फरशी पुल, लोळणी ते कोठुळे दरम्यान एकाच ठिकाणी पडलेले मोठे खड्डे, म्हैसखडक फाटा जवळील बागुलपाडा, उंबरठाण जवळील फणसपाडा फाटा, वांगणबारी, पांगारणे व तेथून पुढे गुजरात सीमेलगत असलेल्या बर्डीपाडा पर्यंत या महामार्गावर ठिकठिकाणी शेकडो लहान मोठे खड्डे पडले आहेत. दळणवळण करिता दोन राज्यांना जोडणारा हा महत्त्वाचा महामार्ग असल्याने सर्व प्रकारच्या वाहनांची ये-जा दिवसरात्र सुरू असते. मात्र रस्त्यावर पडलेल्या खड्यांमुळे चालकांना वाहन चालवताना हकनाक त्रास सहन करावा लागत असून यात वाहनांचे नुकसान होत आहे. खड्डे वाचिवण्याच्या प्रयत्नात अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या महामार्गावर तात्पुरती मलमपट्टी न करता चांगल्या दर्जाची डागडुजी करण्याची मागणी वाहनचालक व परिसरातील नागरिकांनी केली आहे.
नवीन व उंच पुल बांधण्याची मागणी
लहान भोरमाळ जवळील अपघाती वळणावर असलेला फरशी पुल जूना असल्याने या फरशीपुलाची अवस्था काही वेगळी नाही. गेल्या वेळी या ठिकाणी वरच्या भागात मोठे भगदाड पडून वाहतूक बंद झाली होती. उतार आण िवळण असल्याने या फरशीपुलावर अपघात झाले आहेत. पावसाळ्यात नाल्याला पुर येत असल्याने या फरशीपुलाची अवस्था बिकट झाली आहे. त्यामुळे या ठिकाणी नवीन व उंच पुल बांधण्याची मागणी केली जात आहे.
लोळणी ते कोठुळे दरम्यान महामार्गावर पडलेले मोठे खड्डे. (26सुरगाणा1)