शिक्षणासह संस्कारांची रुजवणूकही महत्त्वाची : किरण अग्रवाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 11:24 PM2018-01-23T23:24:48+5:302018-01-24T00:14:02+5:30
सोशल मीडियाच्या वाढत्या कोलाहलात विद्यार्थ्यांना शिक्षित करण्याबरोबरच त्यांच्यात संस्कारांची रुजवणूक करणे हेदेखील तितकेच महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन ‘लोकमत’चे निवासी संपादक किरण अग्रवाल यांनी केले. येथील श्री महावीर विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या शुभारंभ-प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी विद्यालयाचे कार्याध्यक्ष जव्हेरीलाल ब्रह्मेचा होते.
लासलगाव : सोशल मीडियाच्या वाढत्या कोलाहलात विद्यार्थ्यांना शिक्षित करण्याबरोबरच त्यांच्यात संस्कारांची रुजवणूक करणे हेदेखील तितकेच महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन ‘लोकमत’चे निवासी संपादक किरण अग्रवाल यांनी केले. येथील श्री महावीर विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या शुभारंभ-प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी विद्यालयाचे कार्याध्यक्ष जव्हेरीलाल ब्रह्मेचा होते. व्यासपीठावर जैन सोशल ग्रुपच्या महाराष्टÑ रिजनल कमेटीचे चेअरमन सतीश कोठारी, शिवसेनेचे निफाड तालुका अध्यक्ष सुधीर कराड, नाशिकचे सनदी लेखपाल प्रफुल्ल बरडिया, महावीर विद्यालयाचे अध्यक्ष सुनील आबड, जैन प्राथमिक शिक्षण मंदिराचे अध्यक्ष महावीर चोपडा, कार्याध्यक्ष जव्हेरीलाल ब्रह्मेचा, मानद सचिव शांतीलाल जैन, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे अध्यक्ष मोहन बरडिया, अमित जैन, मनोज रेदासणी, संतोष ब्रह्मेचा, महावीर विद्यालयाचे प्राचार्य डी. एस. डुंगरवाल, मुख्याध्यापिका नलिनी शिंदे, प्राचार्य एस.बी. हांडगे व जैन वसतिगृहाचे अधीक्षक डी.एस. कोल्हापुरे उपस्थित होते. महावीर विद्यालयाच्या वाटचालीचा गौरवपूर्ण उल्लेख करीत अग्रवाल पुढे म्हणाले, शालेय अवस्थेत शिक्षण घेताना विद्यार्थी मातीच्या गोळ्यासारखे असतात, त्यांना जसा आकार दिला जातो तसा त्यांच्या जीवनाला आकार प्राप्त होतो. यासाठी संविधानाला अभिप्रेत असलेली समता, ममता व बंधुत्व या सुसंस्कारांची शिकवण मोलाची ठरणार असून, आजच्या बदलत्या सामाजिक वातावरणात हेच बाळकडू मुलांच्या प्रगतीसाठी पूरक ठरेल, असेही अग्रवाल यांनी नमूद केले. याप्रसंगी स्वागत सुनील आबड यांनी केले, तर कार्याध्यक्ष जव्हेरीलाल ब्रह्मेचा यांनी संस्थेच्या वाटचालीचा आढावा घेतला. प्राचार्य दिलीप डुंगरवाल यांनी शालेय प्रगतीचा आढावा घेतला. यावेळी कोठारी, बरडिया यांचीही भाषणे झाली. सूत्रसंचालन पारस लोहाडे, आर्या चोरडिया, तन्वी देशमुख, प्रथमेश कुलकर्णी, पृथ्वीराज पाटील, नूपुर जैन यांनी, तर आभार मधुकर बोडखे यांनी मानले. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
विद्यार्थ्यांना दिली शपथ़़़
‘लोकमत’चे निवासी संपादक किरण अग्रवाल यांनी मार्गदर्शन करीत असताना अचानक व्यासपीठाखाली येऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. अशाप्रकारच्या अनपेक्षित संवादामुळे कार्यक्रमाचा माहोलच बदलून गेला. यावेळी अग्रवाल यांनी विद्यार्थ्यांना ‘मी माझ्या वाढदिवसाच्या दिवशी एका वृक्षाची लागवड करून त्याचे संवर्धन करणार, प्लॅस्टिक पिशवी न वापरता पर्यावरणाचे रक्षण करणार व स्वत:चे घर-अंगण रोज स्वच्छ ठेवणार’ अशा तीन शपथ दिल्या. विद्यार्थ्यांनीही हात पुढे करून उंच स्वरात उत्साहपूर्ण वातावरणात शपथ घेतल्या.