सिन्नरच्या गोंदेश्वर मंदिरात किरणोत्सव..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2018 04:11 PM2018-09-27T16:11:08+5:302018-09-27T16:12:39+5:30
अनुपम्य सोहळा : गाभाऱ्यातील महादेवाच्या पिंडीवर अभिषेक
सिन्नर : येथील बाराव्या शतकातील प्राचीन हेमाडपंथीय गोंदेश्वर मंदिराच्या थेट गाभा-यात सकाळी सूर्य किरणे पोहोचू लागली आहेत. गेल्या तीन दिवसांपासून थेट गाभा-यात महादेवाच्या पिंडीवर सूर्याच्या किरणांचा अभिषेक होत असून हा अनुपम्य सोहळा डोळ्यात साठविण्यासाठी भाविक सूर्योदयावेळी मंदिरात गर्दी करत आहेत.
सिन्नर शहर परिसरात काही प्राचीन मंदिरे आहेत त्यातील बाराव्या शतकात गवळी राजकुमार राजगोविंद यांनी उभारलेले गोंदेश्वर मंदिर आहे. भगवान शंकर व विष्णू यांच्या मिलनाचे प्रतीक असणारे हे गोंदेश्वर मंदिर हेमाडपंथी पंचायतन कलेचा उत्कृष्ट नमुना आहे. या संपूर्ण मंदिराची उभारणीच हत्ती शिल्पात झाली आहे. शंकराच्या प्रत्येक मंदिरात नंदी असतोच असतो. मात्र, इथे नंदीला मंदिरात स्थान नसून मंदिराच्या समोर पूर्वेला नंदीचे स्वतंत्र मंदिर आहे. शंकराचे मुख्य मंदिर मध्यावर असून त्याच्याभोवती चार उपदिशांना पाच मंदिरे अशी रचना आहे. मंदिरासमोरील नंदीच्या मंदिरानंतर श्रीगणेश, पार्वती, सूर्यदेव व विष्णूचे मंदिर आहे. संपूर्ण महाराष्ट्रात सूर्यदेवाची एक-दोनच मंदिरे आहेत. त्यातील एक गोंदेश्वराचे मंदिर आहे. वर्षभर सूर्याचे उत्तरायण, दक्षिणायन सुरू असते. जेव्हा सूर्य मध्यावर येतो, तेव्हा सूर्याची किरणे थेट नंदीच्या मंदिरातून गोंदेश्वर मंदिराच्या सभामंडपातील गाभा-याकडे झेपावतात. गाभा-याच्या प्रवेशद्वाराच्या उंब-यावरील शिल्पांना अनोखी चकाकी देत गाभा-यातील पिंडीवर अभिषेक करतात. या पिंडीची सावली समोरच्या भिंतीवर पडते. तीन ते चार मिनिटे सूर्यकिरणांचा हा उत्सव चालतो.