आमदार किशोर दराडे यांच्या समर्थकांकडून नगरच्या किशोर दराडे यांना मारहाण

By संकेत शुक्ला | Published: June 7, 2024 06:30 PM2024-06-07T18:30:50+5:302024-06-07T18:31:01+5:30

विधान परीषद शिक्षक मतदार संघ निवडणूक : नामसाधर्म्याचा आणखी एक ‘भगरे’ प्रयोग

Kishore Darade of the Ahmednagar was beaten up by supporters of MLA Kishore Darade | आमदार किशोर दराडे यांच्या समर्थकांकडून नगरच्या किशोर दराडे यांना मारहाण

आमदार किशोर दराडे यांच्या समर्थकांकडून नगरच्या किशोर दराडे यांना मारहाण

संकेत शुक्ल/नाशिक : लोकसभा निवडणुकीत तब्बल १ लाखांहून अधिक मते घेऊन चर्चेत आलेल्या बाबू भगरे यांच्यासारखाच नामसाधर्म्याचा प्रयोग शिक्षक विधानसभा निवडणुकीत होत असल्याचे लक्षात येताच नामसाधर्म्य असलेले कोपरगाव येथील राष्ट्रीय जनक्रांती पक्षाचे उमेदवार किशोर प्रभाकर दराडे यांना अर्ज दाखल केल्यानंतर धक्काबुक्की करण्यात आली. अर्ज दाखल केल्यानंतर दराडे विभागीय आयुक्तालयाच्या कार्यालयातच थांबले होते. मात्र, काही काळाने ही माहिती अन्य पक्षांना समजल्यानंतर कार्यकर्त्यांनी कार्यालयात धाव घेत दराडे यांना धक्काबुक्की केली. पोलिसांनी मध्यस्ती करीत वाद तात्पुरता मिटविला.

शिक्षक मतदारसंघासाठी अर्ज दाखल करण्यासाठी शुक्रवारी (दि. ७) अखेरची मुदत होती. त्यामुळे सकाळी १० वाजेपासूनच त्याठिकाणी उमेदवारांची समर्थकांसह गर्दी झाली होती. सुरुवातीला अपक्ष आणि इतर पक्षांचे उमेदवार यांनी अर्ज दाखल केले. उद्धव सेना पक्षाचे उमेदवार संदीप गुळवे यांनी खा. राजाभाऊ वाजे, मविप्र संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, शिवसेना जिल्हाध्यक्ष सुधाकर बडगुजर यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल केला. तर महायुतीकडून अर्ज भरण्यासाठी किशोर दराडे यांच्यासमवेत पालकमंत्री दादा भुसे, माजी खा. हेमंत गोडसे, आ. देवयानी फरांदे, शहराध्यक्ष प्रशांत जाधव, विजय करंजकर आदी उपस्थित होते.

शनिवारी दिवसभरात सुमारे ९ अर्ज दाखल करण्यात आले. त्यातच कोपरगाव येथील किशोर दराडे यांनी अर्ज दाखल केला. ही बातमी समजल्यानंतर कार्यालयात बसलेल्या कोपरगावच्या दराडे यांना महायुतीच्या समर्थकांकडून मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला. मात्र, महायुतीकडून या घटनेचा इन्कार करण्यात आला. शेवटी पोलिसांनी हस्तक्षेप करीत दराडे यांना पोलिस बंदोबस्तात बाहेर काढले. त्यानंतर वातावरण शांत झाले. नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी ५३ अर्ज दाखल झाले असून, माघारीनंतर खरे चित्र स्पष्ट होणार आहे.

याच शिक्षक मतदार संघात उध्दव सेनेकडून ॲड. संदीप गुळवे निवडणूक रिंगणात आहे. असेच साधारणत: नाव असलेले संदीप भीमाशंकर गुळवे, संदीप नामदेव गुळवे हे देखील निवडणूक लढवत आहेत. याशिवार संदीप वामनराव गुरूळे हे देखील आणखी एक नाव असून त्यामुळे मतदानाच्या वेळी मतदारांचा गोंधळ उडण्याची शक्यता आहे.

ए बी फॉर्मचे नाट्य

महायुतीकडून यंदाही अधिकृत उमेदवारीसाठी ए बी फॉर्म देण्यासाठी विलंब करण्यात आला. शेवटच्या दिवसापर्यंत किशोर दराडे यांच्याकडे ए बी फॉर्म नव्हता. अखेरच्या दिवशी तो मिळाल्यानंतर दराडे यांनी पुन्हा अर्ज दाखल केला. यावेळी महायुतीकडून मोठ्या प्रमाणात शक्तिप्रदर्शनही करण्यात आले.

Web Title: Kishore Darade of the Ahmednagar was beaten up by supporters of MLA Kishore Darade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.