के.के. वाघ संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब वाघ यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2022 01:44 AM2022-02-07T01:44:39+5:302022-02-07T01:45:00+5:30
के.के.वाघ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब देवराम वाघ (९०) यांचे रविवारी (दि.६) रात्री १०.३० वाजता निधन झाले. मागील आठवड्यापासून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.
नाशिक : के.के.वाघ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब देवराम वाघ (९०) यांचे रविवारी (दि.६) रात्री १०.३० वाजता निधन झाले. मागील आठवड्यापासून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यानंतर त्यांना आडगाव येथील डॉ. वसंतराव पवार रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच रविवारी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पार्थिवावर सोमवारी दुपारी ३ वाजता के.के. वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या कॅम्पसमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांचे वडील देवराम तथा कर्मवीर काकासाहेब वाघ यांच्या नंतर सामाजिक, सांस्कृतिक, सहकार व शैक्षणिक वारसा समर्थपणे पुढे चालविला. काकासाहेब वाघ यांच्या प्रेरणेने व मार्गदर्शनाने सन १९७० साली के.के. वाघ शिक्षण संस्थेची स्थापना झाल्यापासून ते आजपावेतो संस्थेचे विश्वस्त, उपाध्यक्ष व अध्यक्ष म्हणून तब्बल ५१ वर्षे खंबीरपणे संस्थेची धुरा सांभाळली. शासनाने गठित केलेल्या महाराष्ट्र दुसरा सिंचन आयोगात त्यांनी मोलाची कामगिरी केलेली आहे. महाराष्ट्र राज्य खासगी विनाअनुदानित अभियांत्रिकी, विनाअनुदानित तंत्रनिकेतन आणि विनाअनुदानित कृषी व कृषी संलग्न महाविद्यालय या तिन्ही राज्यस्तरीय संघटनेचे स्थापनेपासून ते १६ वर्षे 'अध्यक्ष' म्हणून कार्यरत होते. महाराष्ट्र साखर कारखाना(श्रीरामपूर), संजीवनी सहकारी साखर कारखाना (कोपरगाव), निफाड सहकारी साखर कारखाना, नाशिक जिल्हा मध्यबर्ती बँक, डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन(पुणे), डेक्कन शिखर संस्था, नॅशनल हेवी इंजिनिअरींग को-ऑप.लि., डिस्टिलरी असोसिएशन ऑफ महाराष्ट्र, महाराष्ट्र राज्य साखर कारखान्यांची कार्यकारी समिती
अशा विविध संस्थांवर त्यांनी संचालक, अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य अशा विविध पदांवर मोलाचे योगदान दिले.