येवल्यात टिमक्यांना नोटाबंदीचा फटका
By admin | Published: March 11, 2017 12:41 AM2017-03-11T00:41:47+5:302017-03-11T00:41:56+5:30
येवला यंदाही कांद्यासह शेतमालाला भाव नाही आणि नोटाबंदीमुळे बाजारपेठेत शांतता दिसून येत आहे. त्यामुळे लोकांचा उत्साह काहीसा कमी झाल्याने त्याची झळ होळीच्या टिमकीला बसली आहे.
दत्ता महाले येवला
कोणताही सण असो की उत्सव तो वेगळ्या पद्धतीने साजरा करण्याची संस्कृती जपण्यासाठी येवलेकर उत्साही असतात. परंतु गेल्या वर्षी दुष्काळी स्थितीमुळे होळी सणालादेखील दुष्काळाचे चटके बसले होते. यंदाही कांद्यासह शेतमालाला भाव नाही आणि नोटाबंदीमुळे रोकडची टंचाई भासत असल्याने बाजारपेठेत शांतता दिसून येत आहे. त्यामुळे लोकांचा उत्साह काहीसा कमी झाल्याने त्याची झळ होळीच्या टिमकीला बसली आहे.
जिल्ह्यासह सर्वदूर टिमकीला मागणी कमी झाली आहे. येवल्यात होळीचा सण ही आगळा-वेगळ्या पद्धतीने साजरा होत असतो. होळी रे होळी, पुरणाची पोळी असे आपण होळी सण जवळ आला की म्हणत असतो. होळी सणाला अनिष्ठ प्रथा, चालीरीती, रु ढी, परंपरा यांचा नायनाट व्हावा यासाठी होळीजवळ बोंबा मारण्याची प्रथा आहे. म्हणूनच होळीला टिमक्या वाजविल्या जातात असे म्हटले जाते. लहान मुलांना टिमकी या देशी वाद्याचे मोठे आकर्षण असते. जनावरांच्या कातड्यांपासून शहरातील चर्मकार समाज टिमक्या बनविण्याचे काम करतो. होळी सणानिमित्त टिमक्या बाजारात दाखल झाल्या आहेत. पंधरा दिवस अगोदरच चर्मकार समाजातील पुरे कुटुंब गेल्या सात दिवसांपासून टिमक्या बनवण्यासाठी सज्ज झालेले असतात. येवल्यात दरवर्षी सुमारे सात ते आठ हजारांच्या आसपास बनविल्या जातात. त्यानंतर सदर टिमकीला आकर्षक रंग, नक्षीकाम केले जाते. २०० ते २५० रुपयांना कातडे मिळते. एका कातड्यात १० ते १२ टिमक्या होतात. टिमक्यांसाठी लागणारी लोखंडी पट्टीचाही भाव आज महागाईच्या काळात ४० रुपये किलोपेक्षा अधिक झाला आहे. आज होलसेलच्या भावात टिमकी ४० ते ८० रुपयापर्यंत मिळते.