गडावर आज कोजागरी उत्सव
By admin | Published: October 15, 2016 01:34 AM2016-10-15T01:34:39+5:302016-10-15T01:36:09+5:30
लगबग : विविध नद्यांच्या जलाने भगवतीला अभिषेक
वणी : नवरात्रीच्या पुण्य पर्वात आईचा जोगवा गाठीशी बांधून भक्त परतीच्या मार्गाला लागतात अन् आदिमायेच्या चरणी तीर्थ अर्पण करण्यासाठी कावडधारकांची लगबग सुरू होते. शेकडो मैलांवरील नद्यांचे तीर्थ कावडीत भरून कवडधारकांची पदयात्रा सुरू झाली आहे. कोजागरी पौर्णिमेला या तीर्थांनी सप्तशृंगी देवीला अभिषेक घातल्यानंतर हे भक्त धन्य होतात. त्याअनुषंगाने मजल-दरमजल करत हे कावडधारक गडाकडे मार्गक्रमण करीत आहेत.
पौर्णिमेला मुंबई भागातील तृतीयपंथीयांची मोठ्या प्रमाणावर गडावर उपस्थिती असते. सवाद्य मिरवणुकीत सुवर्णालंकार परिधान करून तृतीयपंथी सहभागी होतात. पौर्णिमेला सायंकाळी अभिषेक प्रारंभाची प्रतिवर्षीची परंपरा आहे. रात्री १२ वाजता अभिषेक पूर्णाहुती व कोजागरीची सांगता असे नियोजन असते. कावडधारकांना प्रवेशासाठी स्वतंत्र मार्ग असतो. यामार्गावर मोफत फराळ, आरोग्य सुविधा, पिण्याचे पाणी आदि सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नियोजन आखण्यात आले आहे.
गोदावरी, नर्मदा, कृष्णा-गिरणा, भीमा, तापी आदि नद्यांचे पाणी घेऊन कावडधारक गडावर पोहोचण्यासाठी मार्गक्रमण करीत आहेत. मध्य प्रदेशातील इंदूर, खरगौण, धुळे जिल्ह्यातील शहादा, शिरपूर, साक्री, पिंपळनेर, गुजरात राज्यातील बारडोली-आहवा-डांग, नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, मनमाड, दिंडोरी-वणी खेडगाव, सिन्नर, पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर येथील व परिसरातील हजारो कावडधारक गडावर कोजागरी पौर्णिमेला हजेरी लावतात. यापैकी काही कावडधारक तांब्याच्या एका गडव्यातील तीर्थाने वणीच्या जगदंबेलाही अभिषेक घालतात. भगवे वस्त्र, सुशोभित कावड, पायात घुंगरू, जगदंबेचा जयघोष करीत हजारो कावडधारक मजलदरमजल करत गडाकडे मार्गक्रमण करीत आहेत. (वार्ताहर)