कोकाटे, हरिश्चंद्र चव्हाणांच्या अर्जांमुळे युतीत अस्वस्थता
By श्याम बागुल | Published: April 3, 2019 06:18 PM2019-04-03T18:18:07+5:302019-04-03T18:21:14+5:30
माणिकराव कोकाटे यांनी नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी शिवसेनेकडून उमेदवारीसाठी प्रयत्न केले होते. तत्पूर्वी सेना-भाजपाची युती होणार नाही असे गृहीत धरून कोकाटे यांनी लोकसभा निवडणुकीची तयारी काही महिन्यांपासूनच सुरू केली होती. परंतु ऐन निवडणुकीच्या तोंडावर युती झाल्याने कोकाटे यांचा
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : युतीच्या ताब्यात असलेल्या नाशिक व दिंडोरी या दोन्ही लोकसभा मतदारसंघांतून उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेले भाजपाचे विद्यमान खासदार हरिश्चंद्र चव्हाण व माजी आमदार माणिकराव कोकाटे यांनी नामांकन दाखल करण्यासाठी समर्थकांकरवी अर्ज नेल्याने युतीत अस्वस्थता निर्माण झाली आहे. या दोहोंनी अर्ज नेल्यामुळे याचाच अर्थ पक्षनेतृत्व त्यांची समजूत काढण्यास अपयशी ठरल्याचा अर्थ काढला जात असून, त्यांची बंडखोरी दोन्ही लोकसभा मतदारसंघांत पक्षाला मारक ठरणार असल्याचे तर्कवितर्क लढविले जात आहेत.
माणिकराव कोकाटे यांनी नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी शिवसेनेकडून उमेदवारीसाठी प्रयत्न केले होते. तत्पूर्वी सेना-भाजपाची युती होणार नाही असे गृहीत धरून कोकाटे यांनी लोकसभा निवडणुकीची तयारी काही महिन्यांपासूनच सुरू केली होती. परंतु ऐन निवडणुकीच्या तोंडावर युती झाल्याने कोकाटे यांचा भ्रमनिरास झाला. सेनेने उमेदवारी नाकारली तर मतदार संघ सेनेच्या वाट्याला गेल्यामुळे कोकाटे यांनी केलेली तयारी वाया जाऊ नये म्हणून लोकसभा निवडणूक लढविण्याचा इरादा जाहीर करून प्रचाराचा नारळही फोडला आहे. सध्या त्यांचा प्रचार सुरू असला तरी, ऐनवेळी पक्ष त्यांची समजूत घालून माघार घेण्यास भाग पाडतील, असे बोलले जात होते. परंतु मंगळवारी कोकाटे यांनी त्यांच्या समर्थकांकरवी नामांकन अर्ज नेला व सदरचा अर्ज भारतीय जनता पक्षासाठी नेल्याची नोंद सरकारी दप्तरात केली आहे. त्यामुळे कोकाटे यांनी बंडखोरी करण्याची पुरेपूर तयारी केल्याचे मानले जात असून, त्यासाठी त्यांनी भाजपाचे नाव घेतल्याने त्यांना पडद्याआड भाजपाची फूस आहे काय असा अर्थ काढला जात आहे. कोकाटे यांची उमेदवारी शिवसेनेचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्यासाठी धोकादायक मानली जात आहे. दुसरीकडे दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून पक्षाने उमेदवारी नाकारल्याने नाराज झालेल्या हरिश्चंद्र चव्हाण यांनी पक्षाविरुद्ध भूमिका घेतली असली तरी, अपक्ष उमेदवारी करून कोरड्या विहिरीत उडी घेणार नाही, असे जाहीर केल्याने भाजपाला काहीसे हायसे वाटलेले असताना बुधवारी हरिश्चंद्र चव्हाण व त्यांची पत्नी कलावती या दोघांच्या नावे त्यांचे पुत्र समीर यांनी दिंडोरी मतदारसंघासाठी नामांकन नेल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.