कोकम हा सदाहरित वृक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2018 12:39 AM2018-09-09T00:39:22+5:302018-09-09T00:39:53+5:30
कोकम हा सदाहरित वृक्ष असून, तो सरळ वाढतो. मात्र याच्या फांद्या जमिनीकडे झुकलेल्या असतात. या वृक्षाचे नर फुले, मादी फुले एकाच झाडावर असतात. पाने चकाकणारी चवीला थोडी आंबट असतात. भारतात पश्चिम घाटात, कोकणात, केरळ, कर्नाटक, तामिळनाडू या राज्यांमध्ये हा वृक्ष आढळून येतो.
कुसुम दहिवेलकर
कोकम हा सदाहरित वृक्ष असून, तो सरळ वाढतो. मात्र याच्या फांद्या जमिनीकडे झुकलेल्या असतात. या वृक्षाचे नर फुले, मादी फुले एकाच झाडावर असतात. पाने चकाकणारी चवीला थोडी आंबट असतात. भारतात पश्चिम घाटात, कोकणात, केरळ, कर्नाटक, तामिळनाडू या राज्यांमध्ये हा वृक्ष आढळून येतो.
महाराष्ट्रात तेलासाठी कोकमची लागवड केली जाते. कोकम वृक्षाला लाल रंगाचे लिंबूएवढे फळ लागते. हे फळ म्हणजेच कोकम होय. फळे पिकल्यावर गर काढून सरबत बनवितात. नंतर उर्वरित सालापासून आमसूल बनविले जाते. बियांपासून तेल काढतात. म्हणून या फळाचा सर्वांग उपयोगात येतो. कोकम वृक्षाचे साल, पाने, फळे औषधात वापरतात. साल जे काम करते तेच काम पाने करतात. म्हणून साल काढू नये. बियांपासून जे तेल काढले जाते ते जाडसर घट्ट रूपात लोण्यासारखे दिसते. हे तेल खाण्यासाठी वापरले जाते. याशिवाय कोकम तेलाचा उपयोग चॉकलेट, मिठाई आणि मेणबत्ती बनविण्यासाठी जास्त प्रमाणात केला जातो. हे तेल जळताना अडचण येत नाही म्हणून मेणबत्तीमध्ये वापरतात. कोकणात याचा मोठा व्यवसाय आहे. कोकम तेल भिरंडेल तेल म्हणून ओळखले जाते. मूळव्याधात अतिप्रमाणात आग होत असेल तेव्हा कोकम तेल लावतात. मूळव्याधीत रक्त येते अशावेळी आमसूल चटणी बनवून ती दह्यात कालवून खाल्ल्याने रक्त येणे थांबते. शिवाय मूळव्याध बरा होण्यास मदत होते. आमसूल पावडर, सेंधव मीठ एकत्र करून जेवणात सेवन केल्याने रुची वाढते. हातापायाचा दाह होत असेल किंवा आग होत असेल तर अशावेळी कोकम तेल चोळावे. हाडांच्या दुखण्यावर कोकमची पाने वाटून गरम करून हाडांवर लेप करावा याने दुखणे थांबतो. अतिप्रमाणात तूप खाल्ल्याने अपचन होते. अशावेळी कोकम सरबत उत्तम काम करते. तूप पचून तूप शौचाद्वारे निघून जाण्यास मदत होते. शीतपित्तावर कोकमचे सरबत जिरे, साखर घालून घ्यावे. पित्तरोगात किंवा आम्लपितात कोकम वेलची पावडर आणि साखरची चटणी बनवून खावी. थंडीत ओठ फाटतात अशावेळी कोकम तेल ओठांवर चोळावे शिवाय हातापायावर भेगा पडल्या तेव्हासुद्धा कोकम तेल लावल्यास भेगा भरून येतात. उन्हाळ्यात सारखी तहान लागते अशावेळी कोकम सरबतचे सेवन करावे. खोकल्यामध्ये कोकमची पाने आणि खडीसाखर चावून खाल्ल्याने आराम पडतो.