कोल्हापूरच्या व्यावसायिकाला नाशकात मिरचीचा ठसका !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 01:37 AM2021-06-19T01:37:49+5:302021-06-19T01:39:28+5:30
शेतीमालाचा व्यापारी असल्याचे भासवून ऑनलाइन संपर्क साधत, १५ लाख रुपयांची मिरची खरेदी करीत रोख पैसे देण्याचे आमिष दाखवून, कोल्हापूरच्या व्यावसायिकांची पंधरा लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिक : शेतीमालाचा व्यापारी असल्याचे भासवून ऑनलाइन संपर्क साधत, १५ लाख रुपयांची मिरची खरेदी करीत रोख पैसे देण्याचे आमिष दाखवून, कोल्हापूरच्या व्यावसायिकांची पंधरा लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील दत्त कारखाना वसाहतीतील संदीप पाटील यांच्याशी २० फेब्रुवारी ते १ मार्च, २०२१ या दरम्यान संशयित मोहसीन शेख व त्याच्या दोन साथीदारांनी फोनवर संपर्क साधला. संशयित शेख याने शेतमालाचा व्यापारी असल्याचे भासवून १५ लाख रुपयांची मिरची खरेदी करण्याची तयारी
दाखविली.संदीप पाटील यांनी त्यांच्या अभिज्ञा फूड्स या कंपनीच्या माध्यमातून सांगलीमधील माळी ट्रेडर्स यांच्याकडून मिरची विकत घेऊन, ती मोहसीन शेख याला नाशिक येथे पाठवली होती. नाशिक येथे मिरचीचा ट्रक पोहोचल्यानंतर मोहसीन शेख याने पाथर्डी फाटा परिसरात पंधरा लाख रुपयांच्या मिरच्या परस्पर दोन टेम्पोमध्ये उतरवून घेतल्या, तसेच मालाचे पैसे देतो, असे सांगून पैसे न देता, पैसे नसलेल्या बँकेच्या खात्याचा पंधरा लाखांचा धनादेश दिला. पाटील यांनी धनादेश वटविण्यासाठी बँकेच्या खात्यावर जमा केला, परंतु धनादेश वटला नाही. त्यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर, पाटील यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलिसांनी मोहसीन शेख विरोधात गुन्हा दाखल केला आहे.