कोल्हापूर विभागाने पटकावले केंद्रीय युवक महोत्सवाचे विजेतेपद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2018 11:47 PM2018-11-25T23:47:56+5:302018-11-26T00:31:23+5:30
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या केंद्रीय युवक महोत्सवाचे सर्वसाधारण विजेतेपद कोल्हापूर संघाने पटकाविले. विविध विभागांतील नऊ पारितोषिके पटकावून त्यांनी विजय मिळविला. विजेत्या कलाकारांची येत्या ७ ते ११ डिसेंबर दरम्यान नाशिक येथेच होणाऱ्या मुक्त विद्यापीठातील इंद्रधनुष्य आंतरविद्यापीठीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या केंद्रीय युवक महोत्सवाचे सर्वसाधारण विजेतेपद कोल्हापूर संघाने पटकाविले. विविध विभागांतील नऊ पारितोषिके पटकावून त्यांनी विजय मिळविला. विजेत्या कलाकारांची येत्या ७ ते ११ डिसेंबर दरम्यान नाशिक येथेच होणाऱ्या मुक्त विद्यापीठातील इंद्रधनुष्य आंतरविद्यापीठीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास वसाहतीतील नॅब इमारतीत गेले दोन दिवस सुरू असलेल्या या युवक महोत्सवाची सांगता झाली. मुंबई विद्यापीठाचे सांस्कृतिक समन्वयक व प्रा. नीलेश सावे यांच्यासह उपस्थित प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिकवितरण सोहळा झाला. अध्यक्षस्थानी मुक्त विद्यापीठाच्या नाशिक विभागाचे संचालक प्रा. डॉ. धनंजय माने होते.
व्यासपीठावर मुंबई येथील राजभवनचे प्रतिनिधी प्राचार्य डॉ. प्रमोदजी पाबरेकर, विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण व बहि:शाल केंद्राच्या संचालक प्रा. डॉ. विजया पाटील, विद्यापीठाचे वित्त समिती सदस्य डॉ. संजय खडक्कर, नॅबचे सहसचिव मुक्तेश्वर मुनशेट्टीवार, विद्यापीठाच्या नाशिक विभागीय केंद्राचे सहायक कुलसचिव चंद्रकांत पवार उपस्थित होते.
यावेळी सावे म्हणाले की, शिक्षण घेत असताना युवा अवस्थेत मिळेल त्या संधीचे सोने केले पाहिजे. आपली कला सादर करताना त्या कलेपासून आपणास व रसिक श्रोते या दोघांना आनंद मिळाला पाहिजे. विद्यापीठासाठी आपण काय सर्वोच्च योगदान देऊ शकतो याचादेखील विद्यार्थ्यांनी विचार करून त्यानुसार आपले कार्य सुरू ठेवले पाहिजे, असे सांगितले. राजभवन प्रतिनिधी पाबरेकर यांनी आगामी इंद्रधनुष्य स्पर्धेसाठी निवड झालेल्या सर्व कलाकारांना शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचालन श्याम पाडेकर यांनी केले. पवार यांनी आभार मानले. यावेळी विद्यापीठाच्या विविध विभागीय केंद्राचे अधिकारी, पदाधिकारी, विविध लोककलांचे तज्ज्ञ परीक्षक, विद्यार्थी व कर्मचारी आदी उपस्थित होते.