राज्य ॲथलेटिक्स निवड चाचणी स्पर्धेत कोमल, दिनेश अव्वल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:10 AM2021-06-18T04:10:57+5:302021-06-18T04:10:57+5:30
नाशिक : येथील सिन्थेटिक ट्रॅकवर आयोजित निवड चाचणीमध्ये नाशिकच्या खेळाडूंनी सर्वोत्कृष्ट प्रदर्शन करून राष्ट्रीय स्पर्धेसाठी दावेदारी निश्चित केली. १० ...
नाशिक : येथील सिन्थेटिक ट्रॅकवर आयोजित निवड चाचणीमध्ये नाशिकच्या खेळाडूंनी सर्वोत्कृष्ट प्रदर्शन करून राष्ट्रीय स्पर्धेसाठी दावेदारी निश्चित केली. १० हजार मीटर स्पर्धेत नाशिकच्या दिनेशने तर ३ हजार स्टीपल चेस स्पर्धेत कोमल जगदाळेने बाजी मारली.
नाशिकच्या स्व. मीनाताई ठाकरे विभागीय क्रीडा संकुलात सकाळी १० हजार मीटर धावणे या पहिल्या स्पर्धेला सुरुवात झाली. त्यामध्ये नाशिकच्या दिनेशने प्रथम, तर रोहित यादवने द्वितीय स्थान पटकावले. ३००० मीटर स्टिपल चेस शर्यतीत नाशिकच्या कोमल जगदाळेने अव्वल स्थान तर वैष्णवी खाडीलकर हिने द्वितीय क्रमांक पटकावला, तर १० हजार मीटर धावणे या महिलांच्या शर्यतीत निकिता राऊत आणि प्राजक्ता गोडबोले यांनी सुंदर धाव घेत अनुक्रमे पहिला आणि दुसरा क्रमांक मिळविला. महिलांच्या ४०० मीटर धावण्याच्या शर्यतीत यमुना लाडकातने पाहिला तर ताई बामणे हिने दुसरा क्रमांक मिळविला. पुरुषांच्या १०० मीटर धावणे शर्यतीत सौरभ निकमने प्रथम, करण भोसलेने दुसरा तर अक्षय खोत याने तिसरा क्रमांक मिळविला.
पतियाळा, पंजाब येथे दिनांक २५ जून ते २९ जून, २०२१ दरम्यान ६० व्या राष्ट्रीय ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. पुढील महिन्यात टोकियो जपान येथे होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी या राष्ट्रीय स्पर्धेतील कामगिरी ग्राह्य धरण्यात येणार आहे. गुरुवारी पुरुषांची लांब उडी, २०० मीटर धावणे तर महिलांच्या भाला फेक, २०० मीटर धावणे, लांब उडी, हातोडा फेक हे प्रकार होणार आहेत. त्यानंतर पुरुष आणि महिलांची उंच उडी, ११० मीटर, १०० मीटर आणि ४० मीटर हर्डल्स स्पर्धा होणार असून, सर्वात शेवटी ८०० मीटर धावणे, अशा प्रकारे निवड चाचणी पार पडणार आहे, अशी माहिती स्पर्धा आयोजन प्रमुख हेमंत पांडे यांनी दिली.