नाशिक-पुणे रेल्वे मार्ग उभारणीस कोकण रेल्वे कॉर्पोरेशन इच्छुक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2021 04:09 AM2021-03-29T04:09:53+5:302021-03-29T04:09:53+5:30
नाशिक : केंद्र आणि राज्य शासनाने नाशिक-पुणे सेमी हायस्पीड प्रकल्पाला नुकतीच मान्यता दिल्याने नवीन लोहमार्ग तयार करण्याचा मार्ग मोकळा ...
नाशिक : केंद्र आणि राज्य शासनाने नाशिक-पुणे सेमी हायस्पीड प्रकल्पाला नुकतीच मान्यता दिल्याने नवीन लोहमार्ग तयार करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर हा मार्ग उभारणीसाठी काही कंपन्या तयार असून, त्यात कोकण रेल्वे कॉर्पोरेशनचादेखील समावेश आहे.
नाशिक-पुणे रेल्वे मार्ग तयार करण्याचे काम आपल्याच कंपनीला मिळावे, या मागणीचे पत्र नुकतेच कोकण रेल्वे कॉर्पोरेशन कंपनीने राज्याचे वाहतूक आणि बंदरे मंत्रालयाचे मुख्य सचिव आशिषकुमार सिंग यांना सादर केले आहे. कंपनीकडे अद्ययावत साधनसामग्री असून, जम्मू-काश्मीर या उंच डोंगरी भागातही आम्ही केलेल्या रेल्वे प्रकल्प कामाचा अनुभव नाशिक-पुणे रेल्वे मार्ग उभारणीसाठी उपयोगात येणार असल्याचा दावा कोकण रेल्वे कॉर्पोरेशनच्या वतीने करण्यात आला असल्याचे खासदार हेमंत गोडसे यांनी पत्रकात नमूद केले आहे. नाशिक-पुणे रेल्वे मार्ग उभारणीचे काम प्रचंड मोठे आणि प्रदीर्घ काळापासून प्रतीक्षेत असल्याने त्याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे. रेल्वे मार्ग तसेच कोकण किनारीचे आणि डोंगरदऱ्यांमध्ये बोगदे काढून लोहमार्ग तयार करण्याचा कोकण रेल्वे काॅर्पोरेशन लिमिटेड कंपनीला मोठा अनुभव असल्याचा दावादेखील कंपनीने केला आहे.