कोराटे येथील शेतकऱ्याची कर्जाला कंटाळून आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2020 17:49 IST2020-11-28T17:48:29+5:302020-11-28T17:49:58+5:30
जानोरी : दिंडोरी तालुक्यातील कोराटे येथील दिगंबर वामन कदम या शेतकऱ्यांने सततच्या नापिकीला तसेच कर्जाला कंटाळून विष पिऊन आत्महत्या केल्याची घटना नुकतीच घडली आहे.

दिगंबर वामन कदम
जानोरी : दिंडोरी तालुक्यातील कोराटे येथील दिगंबर वामन कदम या शेतकऱ्यांने सततच्या नापिकीला तसेच कर्जाला कंटाळून विष पिऊन आत्महत्या केल्याची घटना नुकतीच घडली आहे.
दिंडोरी तालुक्यातील गट नंबर ३०८ मध्ये शेतामध्येच वास्तव्यास असलेल्या शेतकरी दिगंबर वामन कदम यांच्या मुलाने सहा महिन्यांपूर्वी द्राक्षबागेत पाच रुपयांनी द्राक्षबाग गेल्यामुळे आत्महत्या केली होती. मात्र असे असले तरी दिगंबर कदम यांच्या आपल्या तीन मुलींचे लग्न यापूर्वीच झाली आहे, तर एक मुलगा दत्तात्रय लष्करी सेवेत गुजरात बॉर्डरवर आहे.
कदम यांनी द्राक्षबाग नुकतीच नापिकीमुळे तोडून टाकली आहे. सध्या शेतात कुठल्याही प्रकारचे उत्पन्न नसल्याने मुलगा गेला आपला जगून काही उपयोग नाही, असा विचार ते नेहमी करत होते.
मंगळवारी (दि.२४) रात्री नेहमीप्रमाणे जेवण करून ते घराबाहेर पडले. रात्रभर घरी न परतल्याने त्यांचा बुधवारी (दि.२५) सकाळी तपास सुरू झाला. या दरम्यान पत्नी सुशीला यांना दिगंबर कदम हे घराजवळच ज्याठिकाणी मुलगा बापू कदम याने आत्महत्या केली होती त्या जागेपासून काही अंतरावर झोपलेल्या स्थितीत दिसले व शेजारी विषारी कीटकनाशकाची बाटली आढळून आली.
त्यानंतर त्यांना तात्काळ दिंडोरी ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने सकाळी अकराला नाशिक ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. उपचारादरम्यान बुधवारी रात्री त्यांचे निधन झाले.
विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे त्यांच्यावर साडेतीन लाख रुपये व मध्यवर्ती बँकेचे कर्ज असल्याचे नातेवाइकांकडून सांगण्यात आले.
दिगंबर कदम यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, मुलगा असा परिवार आहे. एकाच घरामध्ये कर्जबाजाराला कंटाळून मुलाचे व वडिलांचे निधन झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. (फोटो २८ दिगंबर कदम)