बिबट्यांचा बंदोबस्त करा : कोटमगावात संतप्त लोकभावना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2020 05:28 PM2020-07-02T17:28:41+5:302020-07-02T17:35:12+5:30
दारणाकाठालगतच्या बिबटप्रवण क्षेत्रातील गावांचा पाहणी दौरा सहायक वनसंरक्षक गणेश झोळे, वनक्षेत्रपाल विवेक भदाणे, वनपाल मधुकर गोसावी यांनी पाहणी दौरा केला.
नाशिक : दारणा नदीकाठालगत असलेल्या नाशिक तालुक्यातील कोटमगावातील शेतकरी वर्गात बिबट्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. येथील लोकभावना तीव्र संतप्त असून बिबट्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी येथील ग्रामपंचायतकडून वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भेटीदरम्यान करण्यात आली.
कोटमगावात कवळे वस्तीवर अमोल पेढेकर नावाच्या १४वर्षीय मुलावर तीन दिवसांपुर्वी बिबट्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने या हल्ल्यात अमोल बचावला; मात्र येथील पंचक्रोशीत अशा प्रकारचे दुर्दैवी हल्ले टाळण्यासाठी या भागात मुक्त संचार करणा-या बिबट्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी सरपंच बाळासाहेब म्हस्के यांच्यासह गावकऱ्यांनी केली आहे.
दारणाकाठालगतच्या बिबटप्रवण क्षेत्रातील गावांचा पाहणी दौरा सहायक वनसंरक्षक गणेश झोळे, वनक्षेत्रपाल विवेक भदाणे, वनपाल मधुकर गोसावी यांनी पाहणी दौरा केला. यावेळी वरिष्ठ अधिका-यांनी ग्रामपंचायत कार्यालयाला भेट दिली. यावेळी म्हस्के यांच्यासह शिवराम घुगे, बाळासाहेब घुगे, श्रीपाद म्हस्के, कारभारी घुगे, पोलीस पाटील सरिता घुगे, साहेबराव म्हस्के यांच्या शिष्टमंडळाने संबंधित वनअधिका-यांकडे केली.
सुरक्षित ‘झोन’ निर्माण करा
या भागातील बिबट्यांसाठी वनविभागाने जंगलाची जागा घेऊन तेथे सुरक्षित ‘झोन’ निर्माण करावा आणि पोषक वातावरण उपलब्ध करून देत त्या जागेत बिबट्यांचे संवर्धन करावे, अशी सुचना यावेळी उपस्थित गावक-यांनी केली; यावेळी प्रोबेशनरी उपवनसंरक्षक पंकज गर्ग यांनी ‘जंगल आहे कुठे, बिबट्यांना सोडणार कोठे? असा प्रतिप्रश्न केल्यामुळे उपस्थित गावक-यांना रोष वाढला. ‘तुम्ही जंगलतोड रोखत का नाही? जंगल नष्ट झाले कसे? असे उलटप्रश्न केले. यावेळी उपस्थित अन्य अधिका-यांनी याप्रसंगी सारवासारव करत वेळ मारून नेली.