कोविड रुग्णांना मिळतोय ‘आनंद’ प्रसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:14 AM2021-05-22T04:14:19+5:302021-05-22T04:14:19+5:30
मालेगावी कॅम्प परिसरातील मित्रांनी आपणही समाजाचे काही देणे लागतो हे उद्दिष्ट समोर ठेवून २०१३ सालात आनंद प्रसाद हा एक ...
मालेगावी कॅम्प परिसरातील मित्रांनी आपणही समाजाचे काही देणे लागतो हे उद्दिष्ट समोर ठेवून २०१३ सालात आनंद प्रसाद हा एक सामाजिक ग्रुप तयार केला. फक्त गोरगरिबांची पोटाची खळगी भरणे हाच उद्देश ग्रुपने सुरुवातीपासून ठेवला. इतर कुठलेही कार्यक्रम ग्रुपमध्ये राबवले जात नाहीत. सुरुवातीपासून अनेक गरीब, निराधार व्यक्तींना एक, दोन वेळचे जेवण मोफत मिळत आहे तर गेल्या वर्षांपासून कोरोनाने थैमान घातले असताना ग्रुपतर्फे शहरातील एम. एस. जी. महाविद्यालयातिल कोविड सेंटर, सटाणा रस्त्यावरील महिला व बालरुग्णालय, संकल्प हॉस्पिटल, बाफना हॉस्पिटल, डॉ. देशमुख हॉस्पिटल, मामको हॉस्पिटल, लोकमान्य हॉस्पिटल, सुविधासह इतर रुग्णालयांमध्ये दाखल कोविड बाधित रुग्ण व त्यांच्यासोबत असलेल्या नातेवाईकास मोफत नाश्ता व जेवण दिले जात आहे. शहरात कोरोनाच्या लाटेत महिनाभरात सात हजाराहून अधिक नागरिकांना या ‘आनंद’चा प्रसाद मिळाला आहे. या कार्यासाठी प्रकाश सुराणा, मणीलाल छाजेड, शांतीलाल बाफना, नितीन मुनोत, कोमल दुगड, संतोष बोकाडिया, सनी मुथ्था, चेतन चोरडिया, शुभम चोरडिया यांच्यासह इतर सदस्यांचे सहकार्य लाभत आहे.
इन्फो
गोरगरिबांना मोफत भोजन
शहरात सध्या रुग्णसंख्या कमी होत आहे. त्यामुळे सकाळचा नाश्ता बंद केला आहे. तरीही दोन्ही वेळचे जेवण नियमित पुरवले जात आहे. त्यामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची चांगली सोय होत आहे. शहरात मागील वर्षी कोरोनाचे आगमन झाले. त्यावेळी सर्वत्र झालेल्या लॉकडाऊनमध्ये अनेक लहानमोठ्या झोपडपट्ट्यांसह इतर सुमारे २५ हजार नागरिकांना आनंद ग्रुपतर्फे जेवण पुरवले गेले होते तर कोविड व्यतिरिक्त ग्रुपमार्फत नेहमी कमी अधिक प्रमाणात गोरगरिबांना मोफत जेवण पुरवले जाते.