कोविडच्या २,०८७ कंत्राटी कर्मचाऱ्यांना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:12 AM2021-01-02T04:12:09+5:302021-01-02T04:12:09+5:30
कायमस्वरूपी सेवेसाठी मागणी लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : जिल्ह्यात कोरोना कालावधीत, तसेच एनएचएमअंतर्गत घेतलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत सामावून ...
कायमस्वरूपी सेवेसाठी मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : जिल्ह्यात कोरोना कालावधीत, तसेच एनएचएमअंतर्गत घेतलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्याची मागणी केली आहे. सद्यस्थितीत या कर्मचाऱ्यांना मुदतवाढ मिळण्याची शक्यता असली, तरी कंत्राटाच्या मुदतवाढीपेक्षा संबंधित आस्थापनांनी कायमस्वरूपी सेवेतच सामावून घेण्याबद्दल कर्मचारी आग्रही आहेत.
करोना महामारीत स्वत:च्या जीवाची पर्वा न करता कंत्राटी कर्मचाऱ्यांनी रुग्णसेवेत झोकून दिले आहे. मात्र, कंत्राटी कर्मचाऱ्यांबद्दल शासनाची भूमिका उदासीन आहे. यासाठी राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी कर्मचारी व आरोग्यसेवा कर्मचारी संघटना समन्वय समितीमार्फत आंदोलन करण्यात आले आहे. कोरोनासंकटात माघार न घेता, कंत्राटी आणि एनएचएम कर्मचाऱ्यांनी स्वत:चा जीव धोक्यात घालून अखंडपणे रुग्णसेवा केली आहे, परंतु कोरोनाच्या रुग्णावर उपचार करीत असताना, मास्क, ग्लोज, सॅनिटाइझर व आवश्यक ती सुरक्षिततेची साधने उपलब्ध असणे अत्यावश्यक आहे. एनआएचएमच्या काही कर्मचाऱ्यांचा सेवा काल पंधरा वर्षांपासून अधिक झाला असूनही शासनाने त्यांचे शासकीय सेवेत समायोजन केलेले नाही. त्यांना अद्याप अत्यल्प मानधनावर काम करावे लागत आहे. तुलनेने नव्याने झालेल्या कंत्राटी भरतीतील कर्मचाऱ्यांनाही त्यांच्यापेक्षा अधिक मानधन देण्यात येते, परंतु याच कोरोना योद्धांची सरकारकडून दखल घेतली जात नाही. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.
कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या
शासनाने रिक्त जागांसाठी कायमस्वरुपी भरती प्रक्रिया राबवावी
कोविड काळात कर्मचाऱ्यांना दिलेल्या सुविधा कायम ठेवाव्यात
लसीकरणासाठीही कंत्राटी कर्मचाऱ्यांना प्राधान्य द्यावे
या अनुभवाचा पदभरती करण्यासाठी विचार व्हावा
आरोग्यसेवेसाठी घेतलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचीच सेवा लसीकरणासाठीही घेतली जाणार आहे. त्यामुळेच १५ फेब्रुवारीनंतर या सेवेला मुदतवाढ मिळणार आहे. मात्र, केवळ मुदतवाढ देण्यापेक्षा कायमस्वरूपी सेवेत घेण्याची गरज आहे.
तुकाराम धात्रक, कंत्राटी कर्मचारी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कंत्राटी कर्मचाऱ्यांनी जीव धोक्यात घालून सेवा दिली, तसेच लसीकरणासाठीही सेवा देणार आहेत. मग या सेवेबद्दल आम्हाला कायमस्वरूपी नोकरी द्यावी, ही आमची न्याय्य मागणी असून, तिचा विचार व्हायला हवा.
अनील जाधव, कंत्राटी कर्मचारी
इन्फो
गरज सरो आणि ...
ज्या काळात घरातील माणसेही आपल्याच कुटुंबातील दुसऱ्या कोरोनाबाधिताच्या जवळ जात नव्हते, अशा अत्यंत जिकरीच्या काळात कंत्राटी कर्मचाऱ्यांनी सेवा दिली आहे. जिल्ह्यात हजारो नागरिकांचे प्राण वाचविण्यात या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे योगदान मोठे आहे. अशा परिस्थितीत कोरोना आटोक्यात आला, म्हणून त्यांच्या सेवेला खंडित केले जाऊ नये.
आरोग्य विभागात अद्यापही अनेक जागा रिक्त आहेत. त्या रिक्त जागांवर या कंत्राटी कर्मचाऱ्यांना घ्यावे किंवा अन्यत्र सामावून घ्यावे. शासनाने ‘गरज सरो आणि ...’ अशा स्वरूपाची भूमिका घेणे अयोग्य आहे. शासनाने बिकट काळातील या अनमोल सेवेचे महत्त्व लक्षात घेऊन, या कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपाची रोजीरोटी उपलब्ध करून देण्याची गरज आहे.
एनआएचएम कर्मचाऱ्यांची दशकभराहून अधिक सेवा
एनआरएचएमअंतर्गत तर जिल्ह्यात दशकभरापेक्षा अधिक काळापासून कर्मचारी सेवा देत आहेत. अशा परिस्थितीत त्यांचा अनुभव हा अत्यंत मोलाचा असल्याने शासनाच्या कोणत्याही आरोग्य भरतीत या कर्मचाऱ्यांनाच प्राथमिकता मिळणे आवश्यक आहे. त्यांच्या सेवेची दखल घेतली गेली नसल्यानेच त्यांना कोरोना कालावधीत आंदोलनाचा पवित्रा स्वीकारावा लागला होता.