मराठा आरक्षणासाठी क्रांती मोर्चा आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2018 01:06 AM2018-07-23T01:06:44+5:302018-07-23T01:07:10+5:30
मराठा क्रांती मोर्चाच्या इशाऱ्यानंतर मुख्यमंत्री महापूजा करणार नसल्याचे स्पष्ट झाल्याने समाजाने दबावतंत्राचा वापर वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.
नाशिक : मराठा क्रांती मोर्चाच्या इशाऱ्यानंतर मुख्यमंत्री महापूजा करणार नसल्याचे स्पष्ट झाल्याने समाजाने दबावतंत्राचा वापर वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय भरतीप्रक्रिया होऊ देणार नसल्याची भूमिका मराठा क्रांती मोर्चाने घेतली आहे. क्रांती मोर्चाने पुन्हा एकदा ‘एक मराठा, लाख मराठा’चा एल्गार केला आहे. सरकारने नरमाईची भूमिका घेतल्यानंतर आंदोलनाची आक्रमकता आणखी वाढली असून, हजारो कार्यकर्ते पंढरपूरमध्ये ठाण मांडून असताना नाशिकमध्ये सोमवारी (दि.२३) पाथर्डी फाटा येथे आंदोलन करण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री आषाढीला पंढरपूरमध्ये महापूजा करणार नसल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर संपूर्ण राज्यभरात मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलन सुरूच आहे. या आंदोलनाचा एक भाग म्हणून नाशिकमधील हजारो मराठा तरुण पंढरपूरमध्ये अजूनही दबाव ठाण मांडून असतानाच मराठा क्रांती मोर्चाचे काही कार्यकर्ते सोमवारी (दि. २३) शहरातील विविध भागात गनिमी कावा पद्धतीने आंदोलन करणार आहेत. राज्यात परळीसह विविध भागात आक्रमक आंदोलन सुरू असताना नाशिकमध्ये सकल मराठा क्रांती मोचातर्फे पाथर्डी फाटा येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ भजन कीर्तन करून मराठा आरक्षणासाठी विठ्ठलाला साकडे घालण्यात येणार आहे. या आंदोलनात पाथर्डी फाटा परिसरातील मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांसह परिसरातील पंचक्रोशीतील कार्यकर्ते सहभागी होणार असून, सोमवारी (दि.२२) सकाळी ११ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत अशाप्रकारे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात मराठा समाजाच्या विविध संघटना सहभागी होणार असून, शहरातील अन्य भागांतही मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलन होण्याची शक्यता आहे.